पुणे | पाणीसाठा ८ टीएमसीवर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस परतला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पाऊस परतला आहे. यामुळे पाणीसाठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा पाणीसाठा शुक्रवारी सायंकाळी ८ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.१४ टीएमसी होता. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत ९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. मात्र, त्या दिवसापासून मागील तीन दिवस पाणलोट क्षेत्रात चारही धरणांमधे १५ मि.मी.पेक्षाही कमी पाऊस झाला.
त्यामुळे मागील तीन दिवसांपासून पाण्यासाठ्यात नगण्य वाढ झाली. मात्र, शुक्रवारी सकाळपासून घाटमाथा तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर दिवसभरात पानशेत २३ मिमी, वरसगाव २३ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
असा आहे धरणसाठा
खडकवासला… १ टीएमसी
पानशेत……….३.६४ टीएमसी
वरसगाव…….२.६५ टीएमसी
टेमघर……..०.७१ टीएमसी





