Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर, पश्चिम महाराष्ट्रात नद्या धोक्याच्या पातळीवर, पूरस्थितीने कोल्हापूर, पंढरपूर, सांगली हैराण

Maharashtra Heavy Rain : मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राला झोडपले असून, पंचगंगा, चंद्रभागा आणि कृष्णा नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे कोल्हापूर, पंढरपूर आणि सांगलीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन सतर्क असून, नागरिकांचे स्थलांतर आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.
पंचगंगा धोक्याच्या उंबरठ्यावर
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी 42 फूट 8 इंचांवर पोहोचली असून, केवळ चार इंचांनी ती धोक्याची पातळी गाठेल. जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेल्याने पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. आंबेवाडी आणि चिखलीतील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी आणि कोल्हापूर-शियेकडे जाणाऱ्या मार्गांवर पाणी शिरल्याने वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असून, आणखी सावधगिरी बाळगत आहे.
पंढरपूरमध्ये पूरस्थिती, चंद्रभागा नदीने वेधले संकट
उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीने 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून 443.18 मीटर गाठली आहे, तर धोक्याची पातळी 445 मीटर आहे. अंबिका नगर आणि व्यास नारायण वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
उजनी धरणातून 1,31,600 क्युसेक आणि वीर धरणातून 25,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे. भीमा आणि नीरा नद्यांचा संगम चंद्रभागेत होत असल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. 42 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
सांगलीत मुसळधार, कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली
सांगलीत मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 42 फुटांवर पोहोचली आहे. कोयना आणि चांदोली धरणांतून विसर्ग कमी केल्याने पाणीपातळी वाढीचा वेग मंदावला आहे. कोयना धरणातून 82,100 क्युसेक आणि चांदोलीतून 15,369 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाटबंधारे विभाग 45 फूट धोक्याची पातळी ओलांडू न देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणाचे वक्र दरवाजे 13 वरून 11 फुटांपर्यंत खाली आणले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर आणि नद्यांचा उधाण यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.





