Rain Update : राज्यात पावसाचा हाहाकार, विदर्भात चौघांचा, मराठवाड्यात दोघांचा मृत्यू

Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं असून, राज्यातील सर्वच विभागांना याचा फटका बसला आहे. विदर्भात विविध घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू, तर मराठवाड्यात भिंत कोसळून 2 जणांचा बळी गेला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, शेतपिकांचे मोठे नुकसान, तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विदर्भात पूरसदृश स्थिती, 4 मृत्यू
- बुलढाण्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू, तर 3 महिला गंभीर जखमी.
- भंडाऱ्यात गुराख्याचा वीज कोसळून मृत्यू.
- यवतमाळमध्ये वीज कोसळून जनावरांचा बळी; मजुराचा मृत्यू.
- भगवान भेंडे (धारमोहा, महागाव) व अर्जुन उईके (कोटंबा, बाभुळगाव) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.
- एकूण 4 मृत्यू, 2 बेपत्ता व 3 जखमी अशी परिस्थिती आहे.
मराठवाड्यात दोन मृत्यू, पिकांचे नुकसान
- धाराशिव जिल्ह्यात मांजरा नदीला आलेल्या पुरात शेतकरी सुबराव लांडगे वाहून गेले.
- कळंब तालुक्यात भिंत कोसळून शेख नासेर आमीन आणि हसिना बेगम शेख यांचा मृत्यू.
- जालना तालुक्यात नागेवादी येथेही भिंत पडल्याचे वृत्त.
- नांदेड जिल्ह्यात शाळेचे वाहन चालवणारे प्रेमसिंग पवार वाहून गेले.
- उमरी व किनवट तालुक्यात रस्ते बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला.
धरणांत पाणी साठा वाढल्याने मांजरा, तेरणा यांसह अनेक धरणे भरली आहेत.
रायगड जिल्ह्यात अंबा नदी धोक्याच्या पातळीवर, तर कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहे. कोकण किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे भीरा जलविद्युत प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून संगमेश्वर बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
जळगाव जिल्ह्यात आठ तालुक्यांत अतिवृष्टी
जळगाव जिल्ह्यात पारोळा, एरंडोल, जामनेर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव आणि रावेर तालुक्यांत अतिवृष्टी झाली. अनेक कच्च्या घरांची पडझड झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातही घर-दुकानांत पाणी घुसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानुसार, येत्या 20 ऑगस्टपर्यंत पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे आणि भोर या भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





