Maharashtra Weather : महाराष्ट्रात ३ दिवस पाऊस बरसणार; विदर्भ आणि मराठवाड्याला दिलासा मिळण्याची शक्यता
Maharashtra Weather : काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटच्या उकाडयापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता वाढल्यास कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची असल्याने हवामानात मोठे बदल जाणवू शकतात. या संभाव्य चक्रीवादळाचे नाव ‘अर्णव’ असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या संभाव्य हवामान बदलामुळे २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळू शकतात. या पावसाचा रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
मात्र, प्रत्यक्ष पाऊस किती आणि कोणत्या भागांत पडेल, हे चक्रीवादळाची दिशा, त्याची तीव्रता आणि पुढील हवामान परिस्थितीवर अवलंबून असेल. तर खबरदारीचा उपाय म्हणून, भारतीय हवामान विभागानं मच्छिमारांना पुढील बुधवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
आज दिवसभर वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि कोल्हापूर येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा:





