Namo Narayana : सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खळखळून हसवलं! जेलर २ मधील मुर्ती अण्णा आहे तरी कोण?
Namo Narayana : ‘जेलर २’ प्रदर्शित झाल्यापासून मूर्ती अण्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नमो नारायण चर्चेत आहे.

Namo Narayana : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना मूर्ती अण्णा या पात्राची भुरळ पडली आहे. सुपरस्टारच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासमोर स्वतःची वेगळी छाप पाडणे सोपे नाही. मात्र, अभिनेता नमो नारायण याने आपल्या अभिनयाच्या जोरावर हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. त्याने साकारलेला मूर्ती अण्णा प्रेक्षकांच्या लक्षात राहतो.
‘जेलर २’ प्रदर्शित झाल्यापासून मूर्ती अण्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नमो नारायण चर्चेत आहे. त्याचा विनोदी अभिनय, संवादफेक आणि पडद्यावरील सहज वावर यामुळे प्रेक्षकांच्या मनात या पात्राने विशेष स्थान निर्माण केले आहे. चित्रपट संपल्यानंतरही मूर्ती अण्णाची शैली आणि त्याचे मजेशीर प्रसंग प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावरही या पात्राशी संबंधित मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खुद्द रजनीकांत यांनीही नमो नारायण यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते.
१७ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे नमो नारायण
आज मूर्ती अण्णाच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या नमो नारायण याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने सॉफ्टवेअर क्षेत्रात काम केले होते. बहरीन, दुबई, मलेशिया आणि अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये त्याने व्यवसाय सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
२०२० मध्ये कॉमेडियन मनोबाला यांच्या ‘वेस्ट पेपर’ या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत नमो नारायण यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितले होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच त्याची अभिनेता आणि दिग्दर्शक समुथिरकानी यांच्याशी जवळची मैत्री होती. सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणून काम करण्याचा त्याचा विचार होता. मात्र, नशिबाने नमो नारायण यांना अभिनयाच्या क्षेत्रात आणले.
‘नादोडिगल’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण
२००९ मध्ये समुथिरकानी दिग्दर्शित ‘नादोडिगल’ या तमिळ चित्रपटातून नमो नारायण याने सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटामुळे त्याची अभिनेता शशिकुमार यांच्याशीही मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी ‘ईसन’ (२०१०), ‘पोराली’ (२०११), ‘कुट्टी पुली’ (२०१३) आणि ‘निमिर्ंधू निल’ (२०१४) यांसारख्या चित्रपटांत काम केले.
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोंबन’ या चित्रपटातील भूमिकेलाही त्याने आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला. गेल्या अनेक वर्षांत विविध भूमिका साकारत अभिनेत्याने तमिळ चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, ‘जेलर २’मधील मूर्ती अण्णाच्या भूमिकेने नमो नारायण याला विशेष लोकप्रियता मिळवून दिली आहे.
कोण आहे ‘जेलर २’मधील मूर्ती अण्णा?
‘जेलर २’मध्ये रजनीकांत यांनी साकारलेल्या टायगर मुथुवेल पांडियन या पात्राला शिक्षा म्हणून मूर्ती अण्णाकडे काम करण्यासाठी पाठवले जाते. मूर्ती हा फळांच्या रसाची विक्री करणारा व्यक्ती असतो. त्याला स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास असतो. मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट बोलून जातो. त्याच्या तोंडी असलेल्या प्रत्येक संवादात प्रेक्षकांना आपले हसू आवरता येत नाही. अभिनेता नमो नारायण याने ‘करुप्पू’ आणि ‘लकी द सुपरस्टार’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.






