दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट! दोन्ही शिवसेना मोठा निर्णय घेणार? शिंदेसेनेकडून पर्यायी जागेची चाचपणी, उद्धव ठाकरेसेनेकडून…

Dussehra gathering : पुढील दोन तीन दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी जय्यत तयारीत पार पडणाऱ्या दोन्ही शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर यंदा मात्र पावसाचं सावट असल्याचे दिसत आहे.
खरंतर दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क हे मैदान मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच होत असते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मेळावा घेण्यासाठी ही मैदान देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे.
पण दोन्ही मेळाव्यांवर पावसाचं सावट घोंघावत आहे. यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून पर्यायी जागेचा विचार करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेच्या मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. याच ठिकणी दसरा मेळावा पार पडणार असल्याचे पक्षाच्या वतीने ठामपणे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळी डोम, गोरेगाव नेस्को आणि आणखी एका बंदिस्त स्थळाचा पर्यायी पर्याय म्हणून कोअर कमिटी स्तरावर विचार सुरू आहे. मेळाव्याला मोठ्या संख्येने राज्याच्या विविध भागातून शिवसैनिक मुंबईत दसरा मिळाव्यासाठी दाखल होत असतात, त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आता हालचालींनी वेग आला आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने दसरा मेळावा अत्यंत महत्वाचा
यंदाच्या मेळाव्याची प्रमुख जबाबदारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसैनिकांवर सोपवण्यात आली आहे. मुंबईतही पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन्ही मैदानावर पावसाचे पाणी दिसत असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने स्टेज बांधण्याची तयारी सुरू झाली आहे. पावसाने उघडीप घेतल्यामुळे या मैदानावर आता साफसफाई केली जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा : “राहुल गांधींना गोळ्या घालू…” ; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान, काँग्रेसकडून थेट अमित शहांना पत्र





