Uttarakhand cloudburst : उत्तरकाशीत पावसाचा हाहाकार.! १५० जणांना वाचविण्यात यश, तर तब्बल ‘इतके’ जण बेपत्ता
Uttarakhand cloudburst – उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये कोसळलेल्या ढगफुटी सदृष्य पावसानंतर अचानक भूस्खलन झाले. या ढगफुटी सदृष्य पावसानंतर आणि भूस्खलनानंतर क्षणार्धात अनेक घरे तसेच हॉटेल वाहून गेली आहेत. या पूरपरिस्थितीतून सुमारे १५० जणांना वाचवण्यात आले आहे, तर ११ लष्करी जवान अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमध्ये प्रचंड पाऊस कोसळत आहे. राज्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हर्षिलमध्ये अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे खीर गंगा नदीच्या जलस्तराची पातळी अचानक वाढली. इतकी की प्रचंड प्रमाणात ढिगारा धराली गावाकडे वाहत आला. हे ढिगारे कोसळण्याच्या मार्गात आलेली घरे, हॉटेल आणि इतर वास्तू वाहून गेले आहेत.
अवघ्या काही क्षणांत सारे काही उद्ध्वस्त झाले आहेत. ढिगारा खाली येण्याचा आणि पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की धराली बाजारपेठा क्षेत्रात ढिगारे तसेच पाण्यामुळे अनेक दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आप्तस्वकीय तसेच नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने स्थानिक चिंतीत आहेत. त्यामुळे शेकडो लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्घटनेनंतर भटवाडीतील एसडीआरएफची टीम लगेचच धरालीकडे रवाना झाली. परंतु भूस्खलनामुळे ऋषिकेश-उत्तरकाशी महामार्ग बंद असल्याने त्यांना उशीर झाला. तसेच खराब हवामानामुळे दोन तुकड्यांना डेहराडूनहून विमानाने पाठविण्यातही अडचणी आल्या.
सध्या लष्कर, आयटीबीपी आणि एसडीआरएफ पथके बाधित भागात बचावकार्य करत आहेत आणि सुमारे १५० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच हर्सिल परिसरातून ११ जवान बेपत्ता आहेत, अशी माहिती संबंधितांनी दिली.
दरम्यान, स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि बचाव पथकाने अडकलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरू केले आहे. सध्या पावसाचा जोर असल्यामुळे ढिगाऱ्यामुळे उत्तरकाशी चिखलमय झाली आहे. त्यामुळे नुकसानीची माहिती समोर येण्यास वेळ लागणार आहे.





