Raigad Politics : शिवसेना-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप ! आनंद परांजपेंनी केलेल्या आरोपांवर गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : रायगडच्या ‘थ्री इडियट्स’ मधल्या एका ‘इडियट्स’ने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली असून त्या ‘इडियट्स’ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला. दुसरीकडे, एक जरी घोटाळा आनंद परांजपे यांनी बाहेर काढून दाखवला तर मी आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असा पलटवार भरत गोगावले यांनी केला. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे.
आनंद परांजपे म्हणाले, खासदार सुनील तटकरे यांच्या भाची सुनेचा विमान अपघातात मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब अद्याप त्या दुःखातून सावरलेले नाही. मात्र, भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी बोलताना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला. परंतु, सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल तर ती त्यांनी बाहेर काढावी. भरत गोगावले यांची गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसामध्ये बाहेर काढणार आहोत.
विधानसभेत सुनिल तटकरे यांनी युती धर्माचे पालन केले. युती धर्माचे पालन केले नसते तर भरत गोगावले काय अजून दोन उमेदवार पडले असते. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर होती. त्यावेळी मतदारसंघात केलेल्या आपल्या कामाच्या जोरावर सुनिल तटकरे हे निवडून आले आहेत. मात्र हे ‘थ्री इडीयट्स’ बेछूट आरोप करत आहे, असे त्यांनी म्हटले.
यावर भरत गोगावले म्हणाले, आता प्रत्येकजण आपापल्या परीने सांगतो. त्यांना पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यावरून जे काही टोचतंय त्यांनी माझे 100 टक्के घोटाळे बाहेर काढावेत. जर घोटाळे बाहेर काढले तर मी मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा देईल. भरतशेठनी स्वतः काय केले हे त्यांनी सांगावे, असे त्यांनी प्रत्युत्तर दिले.





