Raigad News : रायगडमध्ये भीषण अपघात! एसटी बसला डंपरची धडक

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव उपविभागात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. तळा तालुक्यातील तारणे येथे एका भरधाव 10 चाकी ट्रेलरने एसटी बसला जोरदार धडक दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. या अपघातानंतर तळा पोलिसांनी ट्रेलरचालक दीनदयाळ रामकरण पाल याला ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी (8 मे) दुपारी साडेबारा एकच्या सुमारास तळा तालुक्यातील राहटाड येथून तळा येथे जाणाऱ्या एसटीला भरधाव डंपरने तारणे गावाजवळील तीव्र उतारावर धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की डंपरने एसटी बसच्या उजव्या बाजूला पत्रा कापला आणि पुढे डंपर उलटला. डंपरचालक दीनदयाल रामकरण पाल (21, बिहार) याचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात तृप्ती विजय कुटेकर (22), लक्ष्मण राया ढेबे (35, धनगर वाडी), अन्वी रुपेश गमरे (7, आंबेत) आणि विठ्ठल कजबजे (55, खबिवली) या चार प्रवासांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत लखमू पांडुरंग मुकणे (70), काजल समीर जाधव (40), नामदेव नागे, सुनील समीर जाधव (10), मोरेश्वर देवे (19), अनु बरवत (40), विजय शिंदे (28), काशिनाथ ढेबे (52), सविता शांताराम गायकवाड (45), यशवंत नारायण रामाने (77), लक्ष्मण नाग्या गमरी (60) वैष्णवी विजय कुटेकर (25), सखुबाई तुकाराम गायकवाड (70), जयश्री नामदेव गवाने (60), संगीता अंकुश जाधव (40) जखमी झाले आहेत, अशी माहिती माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी दिली आहे. जखमींवर तळा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





