Raigad News : अखेर ‘त्या’ 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले

अलिबाग: खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाल्याने बेपत्ता झालेल्या तीन मच्छीमारांचे मृतदेह सोमवारी अलिबाग तालुक्यातील दिघोडे, सासवणे आणि किहीम येथे सापडले. मासेमारी बंदी असतानाही उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांची ‘तुळजाई’ नावाची बोट शनिवारी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती.
समुद्र खवळलेला असल्याने लाटांच्या तडाख्यात सापडून बोट बुडाली. बोटीत एकूण आठ मच्छीमार होते. यापैकी पाच जण पोहून किनाऱ्यावर पोहोचले, तर तीन मच्छीमार बेपत्ता झाले. तटरक्षक, पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोध मोहीम राबवली. अखेर सोमवारी नरेश राम शेलार, धीरज काशिनाथ कोळी आणि मुकेश यशवंत पाटील यांचे मृतदेह सापडले.
पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आले. बोटीतून वाचलेले हेमंत बळीराम गावंड, संदीप तुकाराम कोळी, रोशन भगवान कोळी, शंकर हिरा भोईर आणि कृष्णा राम भोईर या पाच जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.





