रायगडावरील ‘वाघ्या श्वाना’चे इतिहासातील स्थान काय? वाघ्या नाव कसं पडलं? जाणून घ्या सविस्तर…

Story of Waghya dog of Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भाबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या मागणीने पुन्हा एकदा इतिहास आणि सांस्कृतिक वारशाच्या मुद्द्यावर चर्चेला उधाण आले आहे. संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नाही आणि ती 31 मे 2025 पर्यंत हटवावी. या मागणीमुळे वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा इतिहास आणि त्याभोवती असलेली लोकश्रद्धा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणाचा आणि वाघ्याच्या समाधीच्या इतिहास नेमका आहे तरी काय? जाणून घेऊया…
‘वाघ्या’चा काय आहे इतिहास?
वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची आख्यायिका आहे. मराठीत “वाघ्या” म्हणजे “वाघासारखा” असा अर्थ होतो, ज्यामुळे त्याच्या शौर्याची आणि निष्ठेची कल्पना येते. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर वाघ्याने आपल्या स्वामींच्या चितेवर उडी मारून स्वतःचे बलिदान दिले अशी एक लोककथा सांगितली जाते. ही कथा शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ वाघ्याच्या समाधीच्या निर्मितीचे कारण मानली जाते. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी वाघ्याची एक छोटी समाधी आणि पुतळा उभारण्यात आला आहे, जो आजही भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
या समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात झाली. 1906 मध्ये इंदूरचे प्रिन्स तुकोजी होळकर यांनी 5,000 रुपये (आजच्या काळात सुमारे 17 लाख रुपये) दान देऊन वाघ्याच्या स्मारकासाठी निधी पुरवला होता. पुढे, 1936 मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती आणि नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखाली वाघ्याचा पुतळा शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ उभारण्यात आला. या स्मारकाला ऐतिहासिक नव्हे, तर लोकश्रद्धेचे प्रतीक मानले जाते.
वाघ्या कुत्र्याचा उल्लेख इतिहासामध्ये नेमका येतो कुठून
1905 साली ची. ग. गोगटे यांनी “महाराष्ट देशातील किल्ले” या नावाचे पुस्तक लिहिले होते. आणि याच पुस्तकात गोगटे यांनी त्यांचा प्रसंग लिहिला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यावेळी त्यांना अग्नी देण्यासाठी पालखीत नेण्यात आले होते. आणि अग्नी दिल्यानंतर ती पालखी परत निघाली होती. त्यावेळी त्यांच्या ईमानदार कुत्र्याने ती पालखी जाताना पहिली आणि पळत जाऊन त्याने शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली आणि त्याने आपले प्राण अर्पण केले.
“वाघ्या” नाव कसं पडलं
दहा वर्षानंतर म्हणजेच 1915 मध्ये राम गणेश गडकरी यांनी एक नाटक लिहिले होते, त्या नाटकाचे नाव होते ‘राजसंन्यास’. या नाटकामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर समर्थाघरीचे श्वान असा उल्लेख केला होता. आणि हा वाघ्या कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेला अग्नी दिल्यानंतर चितेमध्ये त्याने उडी घेतली आणि प्राण स्वतःचे आर्पिल. या कुत्र्याने आपली निष्ठा आबासाहेबांपुढे व्यक्त केली. असा उल्लेख या राजसंन्यास नाटकामध्ये करण्यात आला आहे. आणि या कुत्र्याला सर्वात पहिले ‘वाघ्या’ हे नाव या नाटकात देण्यात आले.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी काय म्हटले?
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे कपोल कल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. तसेच, वाघ्या कुत्र्याचे स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली, असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.
नेमका वाद काय आहे?
रायगड किल्ल्यावर असलेला वाघ्या या कुत्र्याचा पुतळा हटविण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 22 मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात हा पुतळा 31 मेपूर्वी हटवावा अशी मागणी केली आहे. “हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे, असे पत्रात संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा कडाडून विरोध
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रायगडावरील वाघ्या श्वानाचे शिल्प हटवण्यास कडाडून विरोध केला आहे. रायगडावरील वाघ्याचे शिल्प आम्ही हटवू देणार नाही. गरज भासल्यास आम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागू, असे त्यांनी म्हटले आहे. स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हाके म्हणाले, संभाजीराजे यांनी वाघ्या श्वानाच्या स्मारकाप्रकरणी सरकारला 31 मे चा अल्टिमेटम दिला आहे.
राज्यातील सर्वच ओबीसी बांधवांचा यावर आक्षेप आहे. त्यांनी 31 मे चीच तारीख का निवडली? त्या दिवशी मातोश्री अहिल्यादेवी यांची जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या गावी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या प्रयत्नांत अडथळा निर्माण करण्यासाठीच मुद्दाम ही तारीख ठरवली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांची निवड रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी किल्ल्याचे संवर्धन करावे. पण ते हे आपले काम सोडून किल्ल्याची नासधूस करत आहेत. ते महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे धनगर समाज म्हणून आमचा त्यांना विरोध आहे, असेही ते म्हणाले.
View this post on Instagram





