Crime News : ऑनलाइन ‘मटका’ जुगारावर छापा
Crime News : वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

लोणी काळभोर : येथे सुरू असलेल्या ऑनलाइन ‘मटका’ जुगारावर पोलिसांच्या तपास पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या मोबाइलमध्ये मटक्याच्या चिठ्ठ्या, आकडे, ऑनलाइन पैशांच्या देवाण-घेवाणीचे संदेश आणि क्यूआर कोडद्वारे व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे हडपसरपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी आणखी एका संशयिताचा शोध सुरू केला आहे.
स्वप्नील शांताराम भालेराव (वय. २९) व मयूर गोपीचंद बडदे (वय २४, दोघेही रा. लोणी काळभोर, ता. हवेली), असे अटकेतील दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भीमराव सोनवणे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, हवालदार अण्णा माने, हवालदार निलेश कोल्हे, कर्मचारी गस्त घालत असताना बौद्धवस्ती परिसरात एका व्यक्तीकडून मोबाइलवर ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईत स्वप्नील भालेराव हा मोबाइलवर ऑनलाइन ‘कल्याण मटका’ स्वीकारताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो जुगाराची माहिती मयूर बडदे याच्याकडे पाठवत असल्याचे समोर आले. पोलिसांनी मयूर बडदे याच्याकडे चौकशी केली असता, तो मिळालेली माहिती पुढे सूरज कांजणे (रा. हडपसर) याला मोबाइलद्वारे पाठवत असल्याची माहिती उघड झाली. दोघांच्या मोबाईलची तपासणी केली असता व्हॉट्स ॲपवर मटक्याच्या चिठ्ठ्यांचे फोटो, आकडे, ऑनलाइन पैशांच्या व्यवहाराचे संदेश तसेच स्कॅनर (क्यूआर कोड) द्वारे पैसे स्वीकारल्याचे पुरावे आढळले. यावरून ऑनलाइन माध्यमातून ‘कल्याण मटका’ जुगाराचे जाळे चालविले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी मोबाइल जप्त करून पुढील तपास सुरू केला असून हडपसर येथील संशयितासह या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.





