Raid 2 Trailer Review: अजय देवगनपेक्षा रितेश देशमुखने वेधले साऱ्यांचे लक्ष

Raid 2 Trailer Review: पहिल्या भागात रामेश्वर सिंह (सौरभ शुक्ला) याला तुरुंगात टाकल्यानंतर, अमय पटनायकच्या भूमिकेत अजय देवगन आता “रेड 2” मध्ये दुसऱ्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याचा सामना दादा मनोहर भाईशी होणार असून, ही भूमिका रितेश देशमुखने साकारली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला “रेड 2” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, अजय देवगनपेक्षा रितेश देशमुखने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
2 मिनिट 34 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये दमदार संवाद, प्रभावी दृश्ये आणि भरपूर थरार पाहायला मिळतो. ट्रेलरची सुरुवात एका दाराच्या खिडकीवर टकटक करण्यापासून होते. खिडकी उघडताच अमय पटनायक म्हणजेच अजय देवगन म्हणतो, “दार उघडा. दादा मनोहर भाईच्या नावावर वॉरंट आहे.” त्याला विचारले जाते, “आतले हे शस्त्रधारी दिसतायत का?” तेव्हा अमय आपल्यासोबत आलेली सरकारी कर्मचाऱ्यांची फौज दाखवतो.
या भागात अजय देवगनच्या पत्नीच्या भूमिकेत वाणी कपूर दिसते आहे, आणि यावेळीही त्याची बदली होताना दाखवली आहे. त्यानंतर रितेश देशमुख अर्थात दादा मनोहर भाईची दमदार एन्ट्री होते. त्याला आईचा आशीर्वाद घेताना दाखवले असून, अमय पटनायकला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून इशारा मिळतो, “तुला माहीत आहे ना तू कोणाविरुद्ध जात आहेस? तिथली सरकार मुख्यमंत्री नाही, दादा भाई चालवतात.” या भागात सौरभ शुक्ला तुरुंगातून बाहेर आलेला दिसतो.
रितेशने लुटली वाहवा
रितेश देशमुख प्रत्येक भूमिकेत चपखल बसतो, पण नकारात्मक भूमिकेत तो अधिक प्रभावी दिसतो. या चित्रपटाचा नायक अजय देवगन असला तरी ट्रेलरमध्ये रितेश देशमुखने साऱ्यांची मने जिंकली. अजय देवगनला प्रामाणिक पोलीस अधिकारी, तर रितेश देशमुखला भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत दाखवले.
दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांची आगामी क्राइम थ्रिलर “रेड 2” चा ट्रेलर हे सिद्ध करतो की, मोठ्या पडद्यावर अजय देवगन आणि रितेश देशमुख यांचा आमना-सामना पाहणे रोमांचक ठरणार आहे. 2018 च्या सुपरहिट “रेड” चा हा सिक्वेल असून, यातही सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
चित्रपटातील स्टारकास्ट
या चित्रपटात अजय देवगन, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला यांच्यासह सुप्रिया पाठक आणि अमित स्याल आहेत. पहिल्या भागात अजयसोबत इलियाना डी’क्रूज होती, तर यावेळी ती भूमिका वाणी कपूरने साकारली आहे. “रेड 2” ची उत्सुकता असलेल्या प्रेक्षकांसाठी ही खुशखबर आहे की, हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





