नेवासे : रेल्वे मंत्रालयाने शनिभक्तांसाठी राहुरी ते शनि शिंगणापूरला जोडणार्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मंजुरी दिली असून 21.84 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग 494.13 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून जमीन अधिग्रहण प्रक्रियेला वेग आला आहे. एकीकडे बेलापूर – परळी रेल्वे मार्गासाठी रेल्वे कृती समितीकडून या मार्गासाठी उपोषण करण्यात आलेले असताना राहुरीहून शनी शिंगणापुरात आता रेल्वे धावणार असल्यामुळे दळणवळण आणि आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राहुरी – शनिशिंगणापूर या रेल्वे मार्गासाठी कोणाचे काही आक्षेप असतील? तर ते त्यांना नोंदविण्यास मुदतही मिळणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राहुरी – शनीशिंगणापूर या रेल्वे मार्गासाठी शनिशिंगणापूर आणि सोनईतील काही जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झालेली असून, या रेल्वेसाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यांची नावे, गट नंबर आणि अन्य विवरणही जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे काही आक्षेप असतील? तर त्यांना त्यासाठी मुदतही देण्यात आलेली आहे. शनि शिंगणापूर हे देशातील जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे दररोज 30 हजार ते 45 हजार भाविक भेट देतात. मात्र या तीर्थस्थळासाठी थेट रेल्वे जोडली गेलेली नव्हती. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे भाविकांना आता प्रवास सुलभ होणार असून राहुरी व परिसरातील आजूबाजूच्या तसेच राज्याच्या कान्याकोपऱ्यातून यात्रेकरू भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तीर्थक्षेत्र नेवासे तालुक्यात येणाऱ्या या रेल्वेमुळे साईबाबांची शिर्डी, राहुरीतील राहू-केतू मंदिर आणि नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिर, कारवीरेश्वर मंदिर यांसारख्या अन्य धार्मिक तीर्थस्थळांपर्यंत भाविकांना प्रवास करता येणार आहे. परिणामी या रेल्वे मार्गमुळे स्थानिक पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी उर्जीतावस्था येणार आहे. या रेल्वे मार्गांवर तयार करण्यात आलेल्या तपशीलवार अहवालानुसार दररोज चार जोड्या प्रवासी गाड्या चालवण्याचे नियोजन असून यामुळे दरवर्षी 18 लाख प्रवासी प्रवास करतील, असा प्राथमिक अंदाज आहे. शनि शिंगणापूर सारख्या महत्त्वाच्या आध्यात्मिक केंद्रासाठी ही रेल्वे सुविधा उभारणी आणि रेल्वे जोडणी हे एक धार्मिक तीर्थस्थळासाठी मोठी पर्वंणी ठरणार असल्यामुळे या रेल्वे मार्गाचे जनतेतून मोठे स्वागत केले जात आहे. हेही वाचा : Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : इशान किशनवर कोसळला दुःखाचा डोंगर; फायनल सामन्याआधी अपघातात बहिणीचे निधन, पोस्ट करत म्हणाला…