सोनई (वार्ताहर) – राज्य परिवहन महामंडळाच्या नेवासा आगाराने नेवासा-राहुरी व घोडेगाव चालणाऱ्या बसेस बंद केल्याने राहुरी-सोनई-घोडेगाव येथे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून तातडीने या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. या बस बंद करण्यामागे नेमके कारण काय आहे हे जाणण्याची उत्सुकता सर्वसामान्य प्रवासी वर्गाला लागली आहे. या मार्गावर जगप्रसिद्ध असे शनिशिंगणापूरचे देवस्थान असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र, बस बंद झाल्याने राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. याचा राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा, अशी मागणी होत आहे. शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गावर चालणाऱ्या गाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर चालणाऱ्या गाड्या या फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहेत का, असा प्रश्न पडतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक विद्यार्थी खासगी क्लासेससाठी जात असतात. त्याचाही विचार महामंडळाच्या अधिकाऱ्याने करण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. महिला वर्गांना अर्ध्या तिकिटात बसने प्रवासाची सवय लावली. आता बसच येत नसल्याने ऐन लग्नसराईत हिरमोड होताना दिसत आहे. खासगी वाहनांतून प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत तरी महामंडळाच्या अधिकाऱ्याने याचा विचार करण्याची गरज आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरूअसताना जर बसेस सुरूअसेल तर लोकांची कामाची व प्रवासाची वेळ ठरत असते पण सध्या बसच येत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होताना दिसत आहे. सर्वांचाच कामाचा अवमेळ होताना दिसत आहे. अनेक वृद्धांना औषधोपचारासाठी नगर , नेवासा, श्रीरामपूर, संभाजीनगर अशा ठिकाणी जावे लागते. पण गेल्या काही दिवसांपासून बस बंद झाल्याने अनेक वृद्ध व महिला प्रवासी बसस्थानकात बसची वाट पाहनू घरी जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नेवासा आगाराने नेवासा-राहुरी व राहुरी-घोडेगाव, शनिशिंगणापूर या बसेस तात्काळ सुरू कराव्या, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.