Rahul Narwekar VIDEO : म्हात्रोळी गावात जमिनीच्या वादावरून राडा; संजय राऊतांचे गंभीर आरोप, तर राहुल नार्वेकरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
Rahul Narwekar VIDEO : नार्वेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, आपण केवळ वाद मिटवण्यासाठी तिथे थांबलो होतो, असा खुलासा केला आहे.

Rahul Narwekar VIDEO : अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात जमिनीच्या वादावरून झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणावरून राजकारण तापलं असून, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ‘जमीन लाटण्याचा’ प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मात्र, नार्वेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, आपण केवळ वाद मिटवण्यासाठी तिथे थांबलो होतो, असा खुलासा केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल नार्वेकर आणि काही सरकारी अधिकारी दिसत आहेत. राऊत यांनी दावा केला की, “म्हात्रोळीतील एक शेतकरी कुटुंब लग्नासाठी घराबाहेर असताना, नार्वेकर सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन तिथे पोहोचले आणि जमीन मोजणी सुरू केली. ही जागा गुजरातच्या एका गुंतवणूकदारासाठी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.” कोकणातील जमिनींवर गुजरातच्या लोकांचा ताबा मिळवून दिला जात असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.
राहुल नार्वेकरांचा खुलासा –
विरोधकांच्या आरोपांनंतर राहुल नार्वेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू स्पष्ट केली आहे. नार्वेकर म्हणाले की, “मी परवा माझ्या शेतजमिनीवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचे मला दिसले. माणुसकीच्या नात्याने मी फक्त त्यांना शांत राहण्याचा आणि वाद मिटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी माझ्या कामानिमित्त निघून गेलो. त्या वादाशी किंवा त्या घटनेशी माझा कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही.” विनाकारण माझे नाव या वादात ओढू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
आज सोशल मीडियावर माझ्याबाबत प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ संदर्भात मी सत्य परिस्थिती स्पष्ट करू इच्छितो.
मी परवा माझ्या शेतजमीनिवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि…— Rahul Narwekar (@rahulnarwekar) February 14, 2026
जागा मालकाची साक्ष –
विशेष म्हणजे, ज्या जागेवरून हा वाद झाला, त्या जागेचे मालक रमेश पाटील यांनीही या प्रकरणी नार्वेकरांना क्लिन चिट दिली आहे. पाटील म्हणाले, “तो व्हिडिओ माझा आणि माझ्या सुनेतील वादाचा आहे. राहुल नार्वेकर तिथून जात असताना त्यांनी आम्हाला फक्त भांडण मिटवण्यास सांगितले. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.”
राजकीय आरोप-प्रत्यारोप –
संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटले की, “कोकणचे स्मशान केले जात आहे. ज्या कुटुंबाने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांचे मी अभिनंदन करतो.” दुसरीकडे, नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांच्या स्पष्टीकरणामुळे राऊतांचे आरोप कितपत टिकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





