राहुल गांधींनी युद्धबंदी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष सत्र तातडीने बोलावण्याची मागणी केली आहे. शनिवारी सायंकाळी भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धबंदीचा करार झाल्यानंतर रविवारी राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि युद्धबंदी या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावण्याची विपक्षाची एकमुखी मागणी पुन्हा मांडली आहे.
राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले, “पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि आजच्या युद्धबंदीवर चर्चा करणे जनता आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ही संधी आपल्या सामूहिक संकल्पशक्तीचे प्रदर्शन करण्याची आणि पुढील आव्हानांना एकजुटीने तोंड देण्याची आहे.”
पंतप्रधानांना उद्देशून त्यांनी पुढे म्हटले, “मला विश्वास आहे की, आपण या मागणीवर गंभीरपणे विचार कराल आणि त्वरित पावले उचलाल.” यापूर्वी २८ एप्रिल रोजी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर विशेष सत्राची मागणी केली होती. खर्गे यांनीही रविवारी स्वतंत्र पत्र लिहून राहुल गांधी यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशांदरम्यान ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांसह तणाव वाढला. शनिवारी ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने कराराला मान्यता दिली, परंतु काही तासांतच युद्धबंदी भंगाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.





