Rahul Gandhi : “काँग्रेसने एवढ्या वर्षात काय केलं ?” केसीआर यांचा सवाल; तर उत्तर देत राहुल गांधी म्हणाले,”तुम्ही ज्या शाळेत आणि विद्यापीठात शिकलात”

Rahul Gandhi : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने यंदा आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी स्वतः उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभा घेतांना दिसून येत आहेत. यादरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे राहुल गांधी आणि काँग्रेसवरजोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. त्याच्यातच एका सभेत केसीआर यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले? असा सवाल केला होता. या त्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
तेलंगणात एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केसीआर यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना,’मला केसीआर यांना सांगायचं आहे की, तुम्ही ज्या रस्त्यांवरून चालताय, ते रस्ते काँग्रेसने बनवले आहेत आहेत. तुम्ही ज्या शाळेत आणि विद्यापीठात शिकलात, ते विद्यापीठ आणि इतर अनेक विद्यापीठं काँग्रेसने उभारली आहेत. ज्या हैदराबादमधून तुम्ही रोज कोट्यवधी रुपयांची चोरी करतायत ते हैदराबाद शहर काँग्रेसने या तेलंगणातील जनतेबरोबर बनवलं आहे.”असे म्हणत केसीआर यांना उत्तर दिले आहे.
पुढे भाजप आणि केसीआर यांच्यात कसे साटेलोटे आहे हे सांगताना राहुल गांधी यांनी,’एक विचित्र गोष्ट आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात, तेच तुम्ही (केसीआर) प्रत्येक वेळी बोलत असता. नरेंद्र मोदीदेखील म्हणाले होते काँग्रेसने काय केलं? आता तुम्हीदेखील तेच म्हणताय. खरंतर भाजपा आणि बीआरएस हे एकच आहेत. भाजपाविरोधात असणाऱ्या नेत्यांवर, पक्षांवर सतत कारवाई होते. ईडी, सीबीआयवाले मागे लागतात, पण बीआरएसच्या मागे लागत नाहीत.” अशी खोचक शंका यावेळी उपस्थित केली.
त्याचबरोबर राहुल गांधी यांनी, माझ्या अंगावर २४ खटले आहेत. माझ्यासाठी ही २४ पदकं आहेत. तेलंगणातल्या निवडणुकांमध्ये मोदी आणि भाजपा केसीआर यांची मदत करतात. तर लोकसभा निवडणुकीत केसीआर भाजपाची मदत करतात. हे एकत्र आहेत. भाजपाने कधी केसीआर यांचं घर हिसकावलं नाही. माझं घर कोट्यवधी भारतीयांच्या काळजात आहे. केसीआर मात्र भाजपाच्या कृपेने महालात राहतात. भाजपाने कधी केसीआर यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द केलं नाही.” असे म्हणत केसीआर भाजपचीच टीम असल्याचे म्हटले.





