Rahul Gandhi : राहुल गांधींकडून ९ महिन्यात ६ परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन, सीआरपीएफचं खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याकडे केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) लक्ष वेधले आहे. त्याविषयीचे पत्र सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेने कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवले आहे.
सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेकडून राहुल यांना झेड प्लस (एएसएल) दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. राहुल घराबाहेर असताना त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या अवतीभवती सीआरपीएफचे १० ते १२ सशस्त्र कमांडो असतात. राहुल यांच्या सुरक्षेशी संबंधित ॲडव्हान्स्ड् सिक्युरिटी लायझन या प्रक्रियेला मोठे महत्व आहे. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून सीआरपीएफकडून राहुल भेट देणार असणाऱ्या ठिकाणांची आधीच पाहणी होते.
मात्र, राहुल पूर्वसूचनेशिवाय काही ठिकाणांना नियोजनाविना भेट देतात. देशांतर्गत आणि परदेश दौऱ्यांवेळीही तसे घडते, असे सीआरपीएफने खर्गेंना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. अघोषित दौऱ्यांमुळे अति महत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) सुरक्षेबाबत अतिशय जोखमीची स्थिती निर्माण होते. त्यामुळे व्हीआयपींनी सुरक्षेविषयी निर्धारित मार्गदर्शक तत्वांचे पालन करायला हवे, अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
सीआरपीएफने पत्रासमवेत मार्गदर्शक तत्वेही उपलब्ध केली. व्हीआयपी सुरक्षेसाठीच्या यलो बुकमध्ये त्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. दरम्यान, सीआरपीएफकडून अशा प्रकारचा त्रव्यवहार नियमित स्वरूपाची बाब आहे. याआधीही राहुल यांच्या सुरक्षेसंदर्भात पत्रं पाठवण्यात आली, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली.





