Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी लोकसभेत हजेरी लावली नाही, कारण ते माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकातील मुद्द्यांवर चर्चा होण्यास घाबरत होते. खासदारांकडून कथित धमकी मिळाल्यामुळे पंतप्रधान अनुपस्थित राहिले, हा दावा त्यांनी फेटाळून लावला. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, काही जणांनी असा आरोप केला की पंतप्रधानांवर हल्ला होण्याची शक्यता होती. या दाव्यांना त्यांनी थेट आव्हान देत म्हटले की, जर कोणत्याही सदस्याने पंतप्रधानांना धमकी दिली असेल, तर एफआयआर दाखल करा आणि त्या व्यक्तीला अटक करा. असे का होत नाही? काँग्रेसचे कोणतेही सदस्य पंतप्रधानांवर हल्ला करतील, असा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. Rahul Gandhi मी जे बोलत होतो, त्यामुळे ते घाबरले आणि अजूनही ते घाबरले आहेत, कारण ते सत्याचा सामना करू शकत नाहीत. विशेषतः लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील खुलासे, तसेच अमेरिकन कराराचा मुद्दा, तो कसा झाला आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम, यावर चर्चा टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. विरोधीपक्ष नेते राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा समोर आल्यानंतरच हे प्रकरण सुरू झाले. सरकारला आपण या विषयावर बोलू नये असे वाटत होते आणि म्हणूनच वारंवार सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले व त्यांना बोलू दिले गेले नाही. कधी सांगितले की पुस्तक उद्धृत करता येणार नाही, मग मासिक उद्धृत करता येणार नाही, आणि शेवटी मला त्याबद्दल बोलूच न देण्याचा प्रयत्न झाला, असे ते म्हणाले. त्याची प्रत कॉंग्रेसकडे आहे… संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुस्तक अप्रकाशित असल्याचा खोटा दावा केला, असा आरोप करत गांधी म्हणाले की पुस्तक प्रकाशित झाले असून त्याची प्रत काँग्रेसकडे आहे. विरोधी पक्षाला बोलू न देणे, काँग्रेस सदस्यांचे निलंबन आणि पंतप्रधानांवर हल्ला करण्याच्या आरोपांचा वापर करून चर्चा दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.