नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमधील कथित अनियमितता आणि मतचोरी विरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवण्याचे सूतोवाच मंगळवारी केले. अभी पिक्चर बाकी है, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी निवडणूक आयोगावरील टीकेचे सत्रही चालू ठेवले. केवळ एका मतदारसंघात मतचोरी घडलेली नाही. तसे अनेक मतदारसंघ आहेत. तसे प्रकार पद्धतशीरपणे राष्ट्रीय स्तरावर घडत आहेत. निवडणूक आयोगाप्रमाणेच आम्हालाही ते ठाऊक आहे. आधी पुरावा नव्हता. आता तो उपलब्ध झाला आहे. आम्ही केवळ राज्यघटनेच्या रक्षणासाठी प्रयत्नशील आहोत. एक व्यक्ती, एक मत ही संकल्पना राज्यघटनेचा पाया आहे. त्या संकल्पनेची अंमलबजावणी हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. मात्र, आयोग कर्तव्य पालन करताना दिसत नाही, असा आरोप राहुल यांनी केला. ते संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. मतदार याद्यांमधील विसंगतीची अनेक उदाहरणे असल्याच्या दाव्याचाही त्यांनी पुनरूच्चार केला. कथित मतचोरीविरोधात कॉंग्रेसने याआधीच व्यापक मोहीम हाती घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी कथित अनियमितता, मतचोरीचा मुद्दा लावून धरला आहे.