RAHUL GANDHI: ‘मोदी पंतप्रधानपदी राहू शकणार नाहीत’; चर्चेच्या आव्हानावर राहुल गांधींचं मोठं विधान
RAHUL GANDHI: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

RAHUL GANDHI: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत समोरासमोर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचं सांगतानाच, या चर्चेनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
संसदेत बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप RAHUL GANDHI:
सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने राहुल गांधी यांना संसदेत चर्चेची मागणी का केली जाते, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना पुरेशी संधी देण्यात आली नाही, असा आरोप केला. शेतकरी कायद्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली असतानाही परवानगी नाकारण्यात आली. तसेच, मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (SIR) मुद्दा आणि चीनशी संबंधित विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.
याशिवाय, माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकातील मुद्द्यांवरही संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यालाही संधी मिळाली नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. अनेकदा आपला मायक्रोफोन बंद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदींनी हव्या त्या व्यक्तीला न्यायाधीश निवडावं!
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत खुल्या व्यासपीठावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. या चर्चेसाठी भाजपला आपल्या पसंतीची कोणतीही व्यक्ती न्यायाधीश म्हणून निवडता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही त्यांनी मोदींना कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही व्यासपीठावर चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलं होतं. चर्चेत देशाची आर्थिक व्यवस्था, भारत-अमेरिका व्यापार करार, अदानी प्रकरण आणि परदेशी शक्तींशी कथित संबंध अशा मुद्द्यांचा समावेश असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
‘चर्चेनंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत’ RAHUL GANDHI:
या चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरं समोर येतील आणि सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. इतकंच नाही, तर या चर्चेनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. मात्र, हे राहुल गांधी यांचं राजकीय विधान असून प्रत्यक्षात अशी चर्चा होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे राहुल गांधी यांचं आव्हान स्वीकारणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






