पवित्र स्नानासाठी महाकुंभमेळ्याला जाणार का? एका शब्दात उत्तर देत राहुल गांधी म्हणाले…

Rahul Gandhi | सध्या उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभमेळ्याला जगभरातील कोट्यावधी भाविकांनी उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींसह अनेक राजकीय नेते, कलाकारांनीही महाकुंभमेळ्याला उपस्थित राहत पवित्र स्नान केले. त्यातच आता काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना महाकुंभला जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधींनी केवळ एका शब्दात उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
राहुल गांधी सध्या रायबरेलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाकुंभला स्नान करण्यासाठी जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी केवळ ‘नमस्कार’ एवढे उत्तर दिले व ते हसत हसत पुढे निघून गेल्याचे पाहायला मिळाले.
रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधी यांनी मूल भारती वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप-आरएसएसचे लोक म्हणतात की इंग्रजी भाषा शिकू नये. पण इंग्रजी भाषा हे एक शस्त्र आहे, जर तुम्ही ही भाषा शिकली तर तुम्ही कुठेही जाऊ शकता. मग ते तामिळनाडू, जपान असो, मुंबई असो किंवा कोणत्याही कंपनीतील नोकरी असो. हिंदी देखील महत्त्वाची आहे, तुमची मुळे तोडणे योग्य नाही. पण इंग्रजी देखील खूप महत्त्वाची आहे.’
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मायावतींनी आमच्यासोबत निवडणूक लढवली असती तर भाजप कधीच जिंकू शकली नसती असा दावाही केला. ते म्हणाले की, मायावती यांनी आमच्यासोबत येऊन लोकसभा निवडणूक लढवावी, असे आम्हाला वाटत होते. मात्र त्यांनी काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. सपा, बसपा आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले असते तर भाजप कधीही जिंकू शकला नसता.’





