Rahul Gandhi In Pune : राहुल गांधींचा पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद, म्हणाले- ‘70 कोटी महिलांची स्वप्ने हीच भारताची ताकद’
Rahul Gandhi In Pune : पुण्यात राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत महिलांचे स्वातंत्र्य, पितृसत्ता, कुटुंबातील समान हक्क आणि ७० कोटी महिलांच्या स्वप्नांवर भाष्य केले.

Rahul Gandhi In Pune : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधला. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी मंचावर येताच विद्यार्थिनींनी ‘राहुल-राहुल’ अशा घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी महिलांचे स्वातंत्र्य, पितृसत्ता, कुटुंबातील समान हक्क आणि महिलांची स्वतंत्र ओळख या मुद्द्यांवर संवाद साधला.
राहुल गांधी म्हणाले, “आज मी राजकारणावर बोलण्यासाठी आलो नाही. आज तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे. तुम्ही काय विचार करता आणि काय करू इच्छिता, हे सांगा. तुमचे विचार तुमच्यासोबतच शेअर करून त्यावर चर्चा करू.”
‘पुरुष महिलांवर नियंत्रण का ठेवू इच्छितो?’
संवादादरम्यान राहुल गांधी यांनी एका विद्यार्थिनीला पुरुष महिलांवर नियंत्रण का ठेवू इच्छितो, असा प्रश्न विचारला. पितृसत्ताक व्यवस्थेमुळे महिलांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, असे तिला वाटते का, याबाबतही त्यांनी विचारणा केली.
यावर विद्यार्थिनीने सांगितले की, ती स्वतःकडे सर्वप्रथम एक माणूस म्हणून पाहते. ‘तू एक महिला आहेस’ असे सांगितले जाते, तेव्हा आपल्याला राग येतो, असेही तिने स्पष्ट केले.
महिलांच्या हक्कांवरही चर्चा –
कुटुंबातील हक्क आणि हिस्सेदारीच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी एका महिलेबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, एखादा भाऊ कुटुंबातील हिस्सा मागतो तेव्हा त्याला ‘अधिकार’ म्हटले जाते; मात्र महिला त्याच हक्काची मागणी करते तेव्हा त्याला ‘हिस्सेदारी’ म्हटले जाते.
यावर महिलेने सांगितले की, अनेक कुटुंबांची अपेक्षा असते की महिलांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत नोकरी करावी आणि त्यानंतर घरी येऊन घरकाम, स्वयंपाक तसेच मुलांची जबाबदारीही सांभाळावी.
‘७० कोटी महिलांची स्वप्ने हीच भारताची ताकद’
भारताच्या सामर्थ्याबाबत बोलताना अनेकजण सैन्य किंवा इतर शक्तींचा उल्लेख करतात. मात्र, देशातील ७० कोटी महिलांची स्वप्ने आणि त्यांचे विचार हीच भारताची खरी ताकद आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
महिलांकडे प्रामुख्याने पत्नी, मुलगी आणि आई या तीन नात्यांच्या चौकटीतून पाहिले जाते. ही नाती चुकीची नाहीत; मात्र महिलेची संपूर्ण ओळख केवळ या नात्यांपुरती मर्यादित असू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचाही संदर्भ दिला. त्यामध्ये मुलीने बालपणी वडिलांवर, तारुण्यात पतीवर आणि वृद्धापकाळात मुलांवर अवलंबून राहावे, अशी मांडणी असल्याचा उल्लेख करत त्यांनी अशा विचारांना लाजिरवाणे म्हटले. पुण्यातील या कार्यक्रमाला पोलिसांनी ३० अटींसह परवानगी दिली होती.





