Trump tariffs : ‘अमेरिकेची कृती भारतीय अर्थव्यवस्थेला उद्धवस्त करेल’, राहुल गांधींचा लोकसभेत इशारा, चीनवरूनही सरकारवर साधला निशाणा

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी अमेरिका आणि चीनशी संबंधित मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. अमेरिकेची जशास तसे आयात शुल्क लादण्याची कृती भारतीय अर्थव्यवस्थेला उद्धवस्त करेल, असा इशारा त्यांनी दिला. त्याशिवाय, चीनने ४ हजार चौरस किलोमीटर भारतीय भूमी बळकावली असल्याकडेही लक्ष वेधले.
लोकसभेत शून्य प्रहरावेळी बोलताना राहुल यांनी सरकारला घेरले. तसेच, अमेरिका आणि चीनशी संबंधित मुद्द्यांवर उत्तरे देण्याची मागणी सरकारकडे केली. अमेरिकेच्या कृतीमुळे वाहन, औषधनिर्माण, कृषी यांसारख्या क्षेत्रांवर प्रतिकूल प्रभाव पडेल, असे ते म्हणाले.
भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंधांची ७५ वी वर्षपूर्ती साजरी करत असल्यावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. चीन आपल्या मोठ्या भूमीवर ठाण मांडून आहे. मात्र, आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री चीनच्या राजदूतांसमवेत केक कापत असल्याचे पाहून मी चकित झालो. चीनने बळकावलेल्या क्षेत्राबाबत काय होतेय हा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी २०२० यावर्षी भारत आणि चीनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाचा संदर्भ दिला.
त्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले. त्यांच्या हौतात्म्यावर केक कापून जल्लोष केला जात आहे. सामान्य स्थिती निर्माण होण्याला आमचा विरोध नाही. मात्र, त्याआधी जैसे थे स्थिती असायला हवी. आपली भूमी पुन्हा आपल्याला मिळायला हवी, अशी आग्रही भूमिका राहुल यांनी मांडली.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी चीनला पत्रं पाठवल्याची माहिती आम्हाला मिळाली. ती आपल्या लोकांकडून मिळाली नाही. तर, चीनच्या राजदूतांनी भारतीयांना दिली. आमच्या भूमीबाबत आणि मित्र देशाने लादलेल्या शुल्काबाबत काय केले जात आहे ते सरकारने सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.





