Rahul Gandhi : मोदींचा रिमोट कंट्रोल उद्योगपतींच्या हाती; राहुल गांधी यांची टीका

बेगुसराय : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना धास्ती वाटते, या टीकेचा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुनरूच्चार केला. तसेच, मोदींचा रिमोट कंट्रोल बड्या उद्योगपतींच्या हाती असल्याचा आरोपही केला. बिहारमधील प्रचार सभांमध्ये बोलताना राहुल यांनी प्रामुख्याने मोदींवर निशाणा साधला. मोदी त्यांची छाती ५६ इंची असल्याच्या बढाया मारतात. मात्र, ट्रम्प यांनी सांगितल्यावर मोदींनी तातडीने ऑपरेशन सिंदूर थांबवले.
मोदी केवळ ट्रम्प यांना घाबरत नाहीत; तर त्यांच्यावर अंबानी आणि अदानी या उद्योगपतींचे नियंत्रण असते. नोटबंदी, जीएसटी यांसारखे बहुतांश मोदी सरकारचे निर्णय छोट्या उद्योगांना उद्धवस्त करून बड्या उद्योगांना लाभ पोहचवण्यासाठी असतात. मात्र, आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्हाला छोट्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायचे आहे. आपण वापरतो त्या फोन, टी-शर्टस्वरील मेड इन चायना लेबलच्या जागी मेड इन बिहार दिसायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.निवडणुकांमधील कथित अनियमितता, मतचोरीचा मुद्दाही राहुल यांनी लावून धरला.
महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेशसारख्या राज्यांतील निवडणुका भाजपने चोरल्या. बिहारमधील मतदार याद्यांमधून विरोधकांच्या महाआघाडीचे समर्थक असणाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाने वगळली. तशा प्रकारच्या अनियमिततांचे पुरावे आम्ही याआधी दिले. यापुढेही तसे पुरावे देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.





