काँग्रेसमध्ये जोश भरण्यासाठी राहुल गांधींची नवी रणनीती, सुरुवात मोदींच्या गुजरातमधून; काय आहे मास्टरप्लान?

Rahul Gandhi | काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरातच्या अरवली जिल्ह्यातून ‘संघटन सृजन अभियान’ या नव्या उपक्रमाची सुरुवात केली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जिल्हा काँग्रेस समित्यांना सक्षम करणे आणि उत्तरदायित्व आधारित यंत्रणा उभारणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, या कालावधीत ते विविध जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच अखिल काँग्रेस पक्षाचे 84वे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले. आता पुन्हा एकदा राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, “राहुल गांधी गुजरातमध्ये ‘संघटन सृजन अभियान’ सुरु करत असून, हे अभियान काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.”
याआधी राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला होता की, भाजपशी गुप्तरीत्या संलग्न असलेल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढले जाईल.
Hon’ble INC President Shri Mallikarjun @kharge ji has said that 2025 is the year of organisational reforms.
Today and tomorrow, Shri Rahul Gandhi will be in Gujarat to kick start this process. He will be launching the INC’s संगठन सृजन अभियान in Modasa, Aravalli district. The…
— K C Venugopal (@kcvenugopalmp) April 15, 2025
काही दिवसांपूर्वी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, “आपल्याला जर लोकांशी नातं निर्माण करायचं असेल, तर भाजप समर्थक आणि निष्ठावान कार्यकर्ते यांच्यात स्पष्ट विभाजन करावं लागेल. गरज भासल्यास 10, 20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर करण्याची तयारी ठेवा.”
भाजपसाठी गुपचूप काम करणाऱ्यांवर टीका करत ते म्हणाले, “जर तुम्ही आतून भाजपसाठी काम करत असाल, तर इथे तुमच्यासाठी जागा नाही. बाहेर जा आणि मग काय करायचं ते ठरवा.”
दरम्यान, गुजरात हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून या राज्यात संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
याशिवाय, यावर्षाखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी आपल्या मित्रपक्षांसोबत निवडणूक रणनीतीवर चर्चा सुरू केली आहे. नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात बैठक झाली. तेजस्वी यादव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधीही उपस्थित होते.





