Giriraj Singh : “राहुल गांधी हे गांधी घरण्याचे शेवटचे वारसदार”; गिरीराज सिंह यांची जहरी टीका
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते असलेल्या राहुल गांधी यांच्याकडे भविष्याकडे पाहण्याची कोणतीही दूरदृष्टी नाही.

Giriraj Singh – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्लाबोल केला असून राहुल गांधी यांची वागणूक शहरी नक्षलवाद्यासारखी असल्याचे म्हटले आहे.
याबरोबरीने त्यांनी त्यांची तुलना मुघल सम्राट बाहादूर शाह जफरशी केली आहे. गिरीराज सिंह यांनी केलेल्या टिप्पणीमुळे पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे. संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर खरमरीत टीका केली.
ते म्हणाले की, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते असलेल्या राहुल गांधी यांच्याकडे भविष्याकडे पाहण्याची कोणतीही दूरदृष्टी नाही. विरोधी पक्षनेते ही जबाबदारी असल्यामुळे त्यांनी सभागृहातील चर्चांमध्ये व मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे अपेक्षित असते.
मात्र, ते नेहमीच या प्रक्रियेतून पळ काढताना दिसून आले आहेत. त्यामुळे मला वाटते की, ज्याप्रमाणे बहादूर शाह जफर हा मुघल राजघराण्यातील शेवटचा सम्राट ठरला, त्याप्रमाणे राहुल गांधी हे देखील गांधी घरण्याचे शेवटचे वारसदार ठरतील, असे विधान त्यांनी यावेळी केले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सध्या पश्चिम आशियातील संघर्ष व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे.
आक्रमक झालेल्या विरोधकांच्या गदरोळामुळे सभागृहाचे कामकाज सातत्याने विस्कळीत होत असल्याबाबत गिरीराज सिंह यांनी नाराजी देखील यावेळी व्यक्त केली.
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते असलेल्या राहुल गांधी यांनी सभागृहाची कार्यवाही रोखण्याऐवजी नियमानूसार आपली बाजू संसदेत मांडावी, असा सल्ला देखील मंत्री गिरीराज सिंह यांनी यावेळी दिला.






