Rahul Gandhi : ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला आधीच देणे हा गुन्हा; राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या कथित वक्तव्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना आणि मोदी सरकारला घेरले. ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला आधीच देणे हा गुन्हा आहे, असे म्हणत त्यांनी दोन प्रश्न विचारले.मोदी सरकारने पाकिस्तानला आधीच माहिती दिल्याचे जाहीर भाष्य जयशंकर यांनी केले. त्यासाठी कुणी परवानगी दिली? संबंधित मोहिमेमुळे आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली, असे सवाल राहुल यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केले. त्यांनी जयशंकर यांचा एक व्हिडीओही शेअर केला.
ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभी आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला होता. आम्ही पाकिस्तानी लष्करावर नव्हे; तर दहशतवादी तळांवर हल्ले करणार असल्याचे त्यामधून सूचित करण्यात आले. त्यामुळे दूर राहण्याचा आणि हस्तक्षेप न करण्याचा पर्याय पाकिस्तानी लष्कराकडे होता. मात्र, आमचा चांगला सल्ला न मानण्याचा निर्णय त्यांनी घेतला, असे जयशंकर संबंधित व्हिडीओमध्ये बोलताना दिसतात.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करणारा भयंकर हल्ला दहशतवाद्यांनी घडवला. त्या हल्ल्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्या धडक आणि धाडसी मोहिमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बिथरलेल्या, चवताळलेल्या पाकिस्तानने भारतीय ठिकाणांवर हल्ल्यांचा प्रयत्न केला. पण, ते सर्व हल्ले सतर्क आणि सज्ज भारतीय सशस्त्र दलांनी परतवून लावले. पाकिस्तानी आगळिकींना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामध्ये पाकिस्तानची मोठी दाणादाण उडाली. भारत आणि पाकिस्तानमधील तो संघर्ष ४ दिवस सुरू होता. अखेर पाकिस्तान नरमल्याने दोन्ही देशांमध्ये संघर्षविरामाचा समझोता झाला.





