नवी दिल्ली : एका टीव्ही चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा उल्लेख करत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाजप प्रवक्त्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेणुगोपाल यांनी अमित शहा यांना लिहिले की, ही धमकी एका छोट्या पदाधिका-याची निष्काळजीपणे दिलेली प्रतिक्रिया नाही. हे जाणूनबुजून निर्माण केलेल्या द्वेषाच्या विषारी वातावरणाचा परिणाम आहे. ज्यामुळे विरोधी पक्षनेते असुरक्षित होतात. आता तुमचा पक्ष आणि सरकार कोणत्या विचारसरणीला पाठिंबा देते हे स्पष्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे. केरळमधील एका वृत्तवाहिनीवर लडाख हिंसाचारावर लाईव्ह चर्चा सुरू होती. यादरम्यान, भाजपच्या वतीने बोलताना माजी एबीव्हीपी नेते प्रिंटू महादेव म्हणाले की, राहुल गांधींच्या छातीत गोळी मारली जाईल. राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने त्यांच्यावर सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. लाइव्ह टेलिव्हिजनवर अशा प्रकारची धमकी देणे हा लोकशाही परंपरेचा अवमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.