Bharat Jodo Yatra । “भाजपाने देशात भीती, द्वेष आणि हिंसा पसरवली” राहुल गांधींची टीका

Bharat Jodo Yatra – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात पोहोचली आहे. दरम्यान वाशिमच्या विविध भागांत राहुल गांधींच्या भव्य सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी शेगावमध्ये आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘भाजपाने आज संपूर्ण देशात भीती, द्वेष आणि हिंसा पसरवली आहे.’ अशा शब्दांत गांधींनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपाकडून देशात पसरवल्या जाणाऱ्या हिंसेने कोणाचाही फायदा होणार नाही. असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
“वीर सावरकर हे भाजपचे आणि आरएसएसचे श्रद्धास्थान कधीच नव्हते…”
राहुल गांधी म्हणाले की,”भाजपाने देशात पसरवलेल्या भीती, द्वेष आणि हिंसेला नष्ट करण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. या प्रदेशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या? का आत्महत्त्या केल्या? शेतकऱ्यांना विचारले की तुम्ही का आत्महत्त्या करता. त्यावर शेतकरी म्हणतोय आमच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. शेतकरी मला म्हणतात, राहुलजी आमचं ५०-६० हजारांचा कर्ज माफ केलं जात नाही, मात्र दुसरीकडे करोडपती, अरबपतींचे कर्ज माफ का होतात? हीच भाजपाने देशात पसरवलेली भीती आहे.”
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधांनाही जर शेतकऱ्यांची व्यथा ऐकली त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर एकही शेतकरी आत्महत्त्या करणार नाही. त्यांनी प्रेमाने शेतकऱ्यांची मागणी ऐकली तर त्यांनाही शेतकऱ्यांची व्यथा समजेल. या यात्रेत फक्त शेतकरी नाही तर युवाही आपली व्यथा मांडत आहेत. हजारो युवायकांशी मी संवाद साधला, कुणाला डॉक्टर तर कुणाला वकील तर कुणाला आर्मीमध्ये जायचंय. आईवडील लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना शिकवतात. मात्र या युवकांना आज बेरोजगार म्हणून राहावं लागत आहे. शिकलेले युवक आज उबरमध्ये गाड्या चालवत आहेत. दोन तीन ठराविक उद्योगपती देशाला लुटण्याच काम करत आहेत. ते आपण सर्वांनी मिळून थांबवायचं आहे.”
LIVE: Public Meeting | Shegaon, Maharashtra | Bharat Jodo Yatra https://t.co/gcFHpeyCwF
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 18, 2022
“दोन भावंडामधील लढाईमुळे एक कुटुंबाला फायदा होत नाही मग भाजपाची हिंसा कोणाच्या फायद्याची? या भूमीवर अनेक आदर्श व्यक्ती निर्माण झाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुलेजी आशा अनेक महान व्यक्तींनी या देशाला घडवले आहे. यांनी कधीही द्वेष पसरवला नाही. यांनी कधीही तुम्हाला हिंसा करा असा संदेश दिला नाही. मग भाजपाचा द्वेष, भीती आणि हिंसा देशाच्या हिताची कशी असेल? अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपावर हल्लाबोल केला.





