पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या भगिनी प्रियंका यांना राहुल गांधींकडून प्रशंसारूपी शुभेच्छा

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असणाऱ्या भगिनी प्रियंका यांना प्रशंसारूपी शुभेच्छा दिल्या. वायनाडमधील जनतेला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. त्या जनतेसाठी प्रियंका यांच्यापेक्षा सरस प्रतिनिधीची कल्पना मी करू शकत नाही.
वायनाडच्या गरजा पूर्ण करण्याचा ध्यास त्या घेतील आणि संसदेत सशक्त आवाज बनतील याविषयी विश्वास वाटतो, अशी भावना राहुल यांनी सोशल मीडियावरून व्यक्त केली. प्रियंका उद्या (बुधवार) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
13 नोव्हेंबरला मतदान –
झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच 14 राज्यांतील 48 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. तसेच दोन राज्यांतील लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे केरळची वायनाड लोकसभा जागाही रिक्त झाली आहे. यूपीमधील 9 जागांसह 13 राज्यांतील 47 विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. केरळमधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभा जागेवर आणि महाराष्ट्राच्या नांदेड लोकसभा जागेवर 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.





