जनसामान्यांचा राहुल गांधी बनले आवाज; विरोधी पक्षनेते म्हणून १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्या पदावर कार्य करताना राहुल यांनी दिलेल्या योगदानाची कॉंग्रेसने तोंडभरून प्रशंसा केली. राहुल जनसामान्यांचा आवाज बनले आहेत. ज्यांचा आवाज ऐकला जात नाही; त्यांचा ते आवाज बनले आहेत, असे त्या पक्षाने म्हटले.
कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल यांची सक्रियता अधोरेखित केली. विरोधी पक्षनेतेपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राहुल यांनी देशभर भ्रमण केले. शेतकरी, कामगार, लोको पायलट आणि समाजातील विविध घटकांची त्यांनी गाऱ्हाणी ऐकली. त्या घटकांचा आवाज ऐकला जावा, त्यांच्याशी संबंधित मुद्दे संसदेसमोर यावेत याची निश्चिती त्यांनी केली, असे खेडा यांनी म्हटले.
मणिपूरमधील हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या जनतेसाठी आवाज उठवण्यापासून ते अयोग्य सरकारी धोरणांना विरोध करण्यापर्यंत राहुल सातत्याने वंचित आणि पीडितांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. मागील दाराने सरकारी भरतीसारख्या (लॅटरल एन्ट्री) पाऊलाला त्यांनी विरोध दर्शवला. ते पाऊल सरकारला मागे घेणे भाग पडले.
राहुल यांच्यामुळे काही निर्णयांवरून सरकारला घूमजाव करावे लागले. ते धर्मनिरपेक्ष मुल्यांचे रक्षण करत आहेत. राजकारणापेक्षाही त्यांची वचनबद्धता सामान्य जनतेप्रती अधिक असल्याचे दिसून येत आहे, असे निरीक्षण खेडा यांनी नोंदवले. लोकसभेच्या मागील २ निवडणुकांत (वर्ष २०१४ आणि २०१९) कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची कामगिरी सुमार ठरली.
त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्याइतके संख्याबळ कुठल्याच विरोधी पक्षाकडे नव्हते. मात्र, यावेळी विरोधी पक्षांच्या आणि विशेषत: कॉंग्रेसच्या संख्याबळात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे राहुल यांच्या रूपाने १० वर्षांच्या खंडाने लोकसभेत विरोधी पक्षनेता सक्रिय झाल्याचे दिसते.





