Rahul Gandhi : हत्येचा प्रयत्न, धमकी आणि…; राहुल गांधींवर लावलेले कलम नेमकं कोणते? अडचणीत होणार मोठी वाढ

Rahul Gandhi : संसद परिसरात हाणामारी प्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध संसद मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर अनेक कलमे लावण्यात आली आहेत.
राहुल गांधींवर कलम 115: स्वेच्छेने दुखापत करणे, कलम 117: गंभीर दुखापत करणे, कलम 125: जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे, कलम 131: गुन्हेगारी शक्तीचा वापर, कलम 351: गुन्हेगारी धमकी, कलम 3(5): समान हेतूसाठी कार्य करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘संसद हे सत्ता दाखवण्याचे व्यासपीठ नाही’
राहुल गांधी यांनी दोन खासदारांना धक्काबुक्की करून जखमी केल्याचा आरोप भाजप करत आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष रोज आंदोलन करतात.
जेव्हा भाजपचे खासदार निषेध नोंदवण्यासाठी आले तेव्हा राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी जबरदस्तीने तेथे घुसून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. संसद हे शारीरिक ताकद दाखवण्याचे व्यासपीठ नाही, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. हा कुस्तीचा आखाडा नाही. राहुल गांधी यांनी भाजपचे दोन खासदार प्रताप सिंग सारंगी आणि मुकेश राजपूत यांना गंभीर जखमी केले आहे.’
काय आहे नेमके प्रकरण?
गुरुवार, 19 डिसेंबर रोजी राहुल गांधींसोबत झालेल्या कथित बाचाबाचीत भाजपचे दोन खासदार जखमी झाल्यामुळे संसद परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हाणामारीत भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना दोन टाके पडले आहेत. त्याचबरोबर मुकेश राजपूत यांचा बीपीचा त्रास खूप वाढला आहे. सारंगी आणि मुकेश राजपूत हे सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.





