हाऊडी इकॉनॉमी, मिस्टर मोदी?

राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक सवाल

नवी दिल्ली : ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. हाऊडी इकॉनॉमी, मिस्टर मोदी? असा खोचक सवाल राहुल गांधी यांनी त्यांना विचारला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील आर्थिक स्थितीवरून विरोधक सरकारवर टीका करीत आहेत. उद्योगातील मंदी, वाढती बेरोजगारी, वाहन आणि गृहबांधणी क्षेत्रातील बिकट स्थिती यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हा प्रश्न विचारला. ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये या कार्यक्रमाची चर्चा आहे. दोनच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य लाभू दे आणि ते कायम आनंदी राहू दे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विकासदर पाच टक्क्‌यांपर्यंत खाली आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले होते. पण त्याचवेळी त्यांनी येत्या काळात स्थितीत नक्कीच बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सलग तिसऱ्यांदा काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×