बंगळुरू – भारतीय क्रिकेटकडे पाहिले तर देशात क्रिकेट खूप मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी निवडक व मोठ्या शहरातून खेळाडू येत होते. मात्र आता क्रिकेटचा प्रसार झाल्याने छोट्या शहरातील खेळाडू देखील चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे आता देशभरातून प्रतिभाशाली खेळाडू क्रिकेटमध्ये येत असल्याचे भारताच्या पुरुष संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बोलताना सांगितले.
‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असणारे भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ खूप यशस्वी झाला होता. विश्वकसोटीची अंतिम फेरी, एकदिवसीय व टी-20 विश्वकरंडक स्पर्धाचा भारत विजेता ठरला होता. याशिवाय भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेवर देखील आपले नाव कोरले. विश्वकरंडक स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांच्या जागी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा आली. आगामी आयपीएल साठी राहुल द्रविड यांच्यावर राजस्थान संघाने प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.
भारतामध्ये क्रिकेटचा प्रचार चांगल्या पदधतीने झाला असल्याचे द्रविड यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्याच्या घडीला भारतीय संघाने असे अनेक खेळाडू आहेत, जे छोट्या शहरातून आले आहेत. आमच्या वेळी काही निवडक शहरातीलच खेळाडू राष्ट्रीय संघातून प्रतिनिधित्व करायचे. मात्र, सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या स्पर्धा आणि क्रिकेट संस्कृती भारतीय क्रिकेटला अजून शक्तिशाली बनवत असल्याचे द्रविड यांनी बोलताना सांगितले.
रणजीमध्ये कोणताच संघ दुबळा नाही…
देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धानमुळे क्रिकेटचा दर्जात सुधारणा झाली आहे. तुम्ही रणजी करंडक स्पर्धेत कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. मी जेव्हा खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा दक्षिणेतील तामिळनाडू व हैद्राबाद संघ वगळता इतर संघासोबत आत्मविश्वासाने खेळायचो, आता मात्र प्रत्येक संघ मजबूत झाला आहे.