राहुल आणि प्रियांका गांधी संभलकडे रवाना, मात्र गाझीपूरमध्ये पोलिसांनी रोखले..

Rahul Gandhi and Priyanka Gandhi | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह उत्तर प्रदेशातील अन्य पाच काँग्रेस खासदार बुधवारी (४ डिसेंबर) उत्तर प्रदेशातील हिंसाचार ग्रस्त संभलला भेट देणार आहेत. यासाठी ते रवाना झाले आहेत. मात्र प्रशासनाने नेत्यांच्या भेटींवर बंदी घातली आहे. यासाठी गाझियाबाद आणि दिल्ली सीमेवर पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.
राहुल गांधी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत संभल दौऱ्यासाठी दिल्लीहून निघाले. पण घरातून निघाल्याबरोबर गाझीपूरच्या सीमेवर पोहोचलो असता पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावले असून राहुल गांधींच्या ताफ्याला जाऊ दिले जात नाही. संभलमध्ये जाण्यास १० डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना दिल्लीतच रोखण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती आहे. गाजियाबाद पोलिसांनी दिल्ली सीमेवर सुरक्षा वाढवली असून, वाहनांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी संभाल न्यायालयाने शहरातील कोट पूर्व परिसरात असलेल्या मुघलकालीन जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते आणि त्याच दिवशी एका पथकाने तेथे सर्वेक्षण केले. तेव्हापासून वाद निर्माण झाला होता. २४ नोव्हेंबर रोजी संभलमधील जामा मशिदीबाहेर स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती.
न्यायालयाने जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर पुरातत्व सर्वेक्षण विभागाची टीम येथे आली. त्यावेळी ही घटना घडली होती. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले होते. हिंसाचारानंतर चार दिवस बाजारपेठा बंद होत्या. संभल प्रशासनाने सुरक्षा वाढवून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पप्पू यादवही राहुल गांधींसोबत आहेत. ते म्हणाले की, ‘राहुल गांधी संविधान वाचवण्यासाठी आणि द्वेष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी आणि योगी यांच्यातील हे युद्ध आहे. पंतप्रधान कोण होणार, उद्या काय होणार? ही लढाई आहे हिंदू सम्राट होण्यासाठी आहे.’ दरम्यान, आता दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याने कॉँग्रेस काय रणनीती आखणार हे पहावे लागेल.
Rahul Gandhi and Priyanka Gandhi |
हेही वाचा:
सोनू सूद दिग्दर्शनासाठी सज्ज; चित्रपटाच्या रिलीजपूर्वी घेतले उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन





