प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – भाजपचे पंचायतराज रहिमतपूर मंडलाध्यक्ष सोमनाथ कृष्णत निकम यांच्यावर रहिमतपूरनजीक जयपूर गावाच्या हद्दीत शिवनेरी शुगर या खाजगी कारखान्याच्या परिसरात कोयत्याने वार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जयपूर गावाच्या हद्दीत असलेल्या शिवनेरी शुगर या साखर कारखान्याच्या हद्दीलगत जयपूर येथील सोमनाथ निकम यांची जमीन आहे. ही जमीन शिवनेरी कारखान्याकडे आहे. या जमिनीत विनापरवाना डांबरीकरण सुरू असल्याने, जागा मालक सोमनाथ निकम व त्यांचे बंधू श्रीकांत निकम हे कारखाना व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी गेले होते. तेथे वाद सुरू असताना, एकसळ येथील पैलवान सचिन शेलार हा आठ-दहा साथीदारांसह त्या ठिकाणी गेला. त्यातील दोघा-तिघांनी श्रीकांत निकम यांना धरून ठेवले, तर सचिन शेलारने ऊस तोडण्याच्या कोयत्याने सोमनाथ निकम यांच्या डोक्यात वार केला. निकम यांना जयपूर ग्रामस्थांनी रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल केले. निकम यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रहिमतपूर पोलीस ठाण्यात सुरू होती. कारखाना ठरतोय वादाचा केंद्रबिंदू.. जयपूर व पिंपरी या गावांच्या हद्दीत असलेला हा खाजगी साखर कारखाना वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या वर्षी काटामारीचा आरोप करत, तारगाव परिसरातील शेतकर्यांनी गेटवरील वाहने अडवून, मोठा गोंधळ घातला होता. कारखान्याचे ओढ्यात सोडलेले दूषित पाणी जयपूर व पिंपरी येथील अनेक विहिरींमध्ये मिसळल्याचा आरोप करत, जयपूर व पिंपरी ग्रामस्थांनी कारखाना स्थळावर आंदोलन केले होते. कारखान्याच्या चिमणीतील राख जयपूर गावच्या हद्दीत पडत असल्याने प्रदूषण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.