पुण्यात दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग

पुणे – बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तर, या प्रकरणात प्रशासन पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.
रॅगिंग झालेल्या प्रकरणात एक विद्यार्थिनी क्ष-किरणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत असून, ती सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आहे. तर दुसरी विद्यार्थिनी भूलशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. यातील एका प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला असून, दुसऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
क्ष-किरणशास्त्र विभागात वैद्यकीय पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मार्च महिन्यात रॅगिंग झाल्याबाबत तक्रार दिली आहे. तिने तक्रार दिल्यानंतर रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे. तर, दुसरी घटना गेल्या आठवड्यात घडली आहे.
“गेल्या महिन्यात रॅगिंगबाबत पदव्युत्तरच्या एका विद्यार्थिनीने तक्रार केली होती. त्याची चौकशी करून तो अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात गेल्या आठवड्यात घडला असून एका विद्यार्थिनीची तक्रार मिळाली आहे. परंतु, तो विभागांतर्गत वाद असून त्याचीही चौकशी सुरू आहे.” – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता





