– वंदना बर्वे Raghav Chadha : केंद्र सरकारविरूद्ध उगारलेली तलवार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी म्यान केली म्हणून पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, चढ्ढा यांनी अशी मवाळ भूमिका का घेतली? हा खरा संशोधनाचा विषय आहे. आम आदमी पक्षाने राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांची उपनेतेपदावरून उचलबांगडी केली आहे. यानंतर आपचे अन्य नेते आणि राघव चढ्ढा यांनी एकमेकांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. पक्षाने हकालपट्टीची केलेली कारवाई कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचं काम चढ्ढा करीत आहेत. तर राघव चढ्ढा यांनी पक्षाच्या धोरणांना कशी मूठमाती दिली हे सांगण्याचं काम आपचे नेते करीत आहेत. किंबहुना, राघव चढ्ढा यांनी पक्षापासून वेगळी चूल मांडली होती असंच काही दिवसांपासून दिसून येत होतं. याची प्रचिती आली ती न्यायालयाने आप संयोजक अरविंद केजरीवाल यांची मद्य धोरण घोटाळ्यातून मुक्तता केल्यानंतर. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची निर्दोष मुक्तता झाली. यानंतर पक्षात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. आपच्या नेत्यांनी भाजप सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग करण्याचा आरोप केला. माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांचे अश्रू अनावर झाले. केजरीवाल, संजय सिंह, सिसोदिया आणि इतर नेते भाजपवर षड्यंत्राचा आरोप करत होते. हे सगळं सुरू असताना आपचा आक्रमक चेहरा राघव चढ्ढा यांनी पूर्ण मौन पाळले. राज्यसभेत गिग वर्कर्स आणि शाळेच्या श्लकाचे मुद्दे उपस्थित करणारे राघव चढ्ढा यांनी आपच्या नेत्यांच्या निर्दोष सुटकेवर एक शब्दही काढला नाही. या मौनामुळे राजकीय चर्चेला अधिकच खतपाणी मिळाले. आम आदमी पार्टी आणि राघव चढ्ढा यांच्यातील वाढत्या दुराव्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची कार्यशैली. राज्यसभेत पक्षाच्या धोरणाला अनुसरून न बोलता वेगळ्याच विषयांना प्राधान्य देणे हे नित्याचे झाले होते. चढ्ढा आपली वैयक्तिक प्रतिमा उजळून काढण्याचा अधिक प्रयत्न करताना दिसत होते. ही बाब पक्षाच्या जिव्हारी लागली नसती तरच नवल. राघव चड्ढा (Raghav Chadha) पक्षाच्या धोरणापेक्षा स्वतःच्या ब्रँडिगला जास्त महत्त्व देत आहेत असं आपच्या नेत्यांना वाटू लागलं. परिस्थिती एवढी बिघडली की, केजरीवाल यांचे एकेकाळचे सर्वाधिक विश्वासू रणनीतिकार चढ्ढा पक्षापासून दूर जाऊ लागले. त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्ट आणि व्हिडिओंमधून पक्षाचे नाव, झेंडा आणि निवडणूक चिन्ह गायब झाले होते. या सर्व गोष्टी दोघांमध्ये निर्माण झालेली दरी सांगत होते. केंद्र सरकारच्या अंगावर धावून जाणारे राघव चढ्ढा एवढे मवाळ कसे काय झाले? हा खरा प्रश्न आहे. खरं म्हणजे, त्यांच्या लग्नानंतर राजकीय परिस्थिती फार बदलली. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंग यासारख्या नेत्यांना पकडून तुरूंगात डांबण्याचा सपाटा लावला होता. या नेत्यांनंतर पुढचा नंबर राघव चढ्ढा यांचा आहे अशी चर्चा जोर पकडत होती. हे सगळं सुरू होतं तेव्हा चढ्ढा यांचं लग्न झालं होतं. आता चढ्ढा यांनाही अटक केली जाईल अशी चर्चा रंगली असतानाच ते डोळ्याचे ऑपरेशन करण्याच्या बहाण्याने लंडनला निघून गेले. आप ला ईडी आणि सरकारच्या कारवाई विरोधात बोलायला प्रवक्ता हवा होता. arvind kejriwal मात्र, चढ्ढा परदेशात निघून गेले. याच काळात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार करायचा होता. यातूनही ते गायब राहिले. या दोन कारणांमुळे आप आणि राघव चढ्ढा यांच्यात दुराव्याची ठिणगी पडली. अशातच, पत्नीच्या मोठ्या बहिणीने मध्यस्थी करून चढ्ढा यांना सरकारच्या विरोधात आक्रमकपणे न बोलण्यास राजी केले. यामुळे त्यांच्यावर होणार असलेली कारवाई झाली नाही. पक्षाला सर्वाधिक गरज असताना सेनापतीने अशी मवाळ भूमिका घेणे पक्षाला रूचले नाही. डोळ्यांच्या आजाराचे कारण देत पत्नी परिणीती चोप्रासोबत लंडनला प्रस्थान केले. पक्षात आणि सोशल मीडियावर अशा अफवा वेगाने पसरल्या की, एकीकडे सरसेनापती अडचणीत असताना, त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी मैदानाबाहेर परदेशात सुट्टी घालवत आहेत. राघव चड्ढा केवळ आजारपणामुळेच परदेशात गेले नव्हते. कथित दारू घोटाळ्याच्या तपासादरम्यानही त्यांचे नाव समोर आले होते. ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या अटकेनंतर राघव यांच्यावरील दबाव वाढला होता. त्यांना आपल्या अटकेची भीती वाटत होती. याच भीतीमुळे ते पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि आंदोलनांपासून दूर राहिले. केजरीवाल तिहार तुरुंगात असताना, राघव यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. केजरीवाल यांच्या अटकेच्या दुसर्या दिवशी ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी आता पुढचा नंबर राघव चड्ढा यांचा असल्याचे भाकित केले होते. निवडणुका तोंडावर असताना आणि केजरीवाल-सिसोदिया तुरुंगात असताना राघव चड्ढा कुठे आहेत? राघव चड्ढा भाजपमध्ये कधी सामील होणार आहेत? असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले होते. पक्षनेत्याच्या नाराजीचे एक प्रमुख कारण म्हणजे राघव चड्ढा यांचे राज्यसभेतील वर्तन. आम आदमी पक्षाला वाटत होते की, वाढत्या गॅस सिलेंडरच्या किमती, बेरोजगारी आणि परराष्ट्र धोरण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राघव यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडावे. मात्र, या मुद्द्यांऐवजी राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी सोशल मीडियावर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा विषयांवर बोलणे पसंत केले. त्यांनी अनेकदा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत विधाने केली. पक्षाच्या सक्रिय राजकारणातून आणि आंदोलनांमधून त्यांची अनुपस्थिती त्यांच्यावरील पक्षाच्या विश्वासात सातत्याने घट होत असल्याचे स्पष्टपणे दर्शवत होती. गुरुवारी आपने त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यावर याला दुजोरा मिळाला. राघव चढ्ढा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात परदेशात असण्यापासून ते इंडिया आघाडीच्या निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर सही करण्यास नकार देण्यापर्यंतच्या घटनांमुळे पक्ष त्यांच्यावर नाराज आहे. मात्र, आपल्याला औपचारिक किंवा अनौपचारिकपणे एकदाही सही करायला सांगितलं नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. मात्र, पक्षाचा मॅसेज सर्वांसाठी असतो. प्रत्येकाला वेगळा संदेश देण्याची गरज नसते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आम आदमी पक्षाचा असाही आरोप आहे की, संसदेत सौम्य मुद्दे उपस्थित करून ते स्वतःचा जनसंपर्कही साधत होते. त्यांचा पक्षाच्या धोरणाशी काहीही संबंध नव्हता. केजरीवाल यांच्या मते जनतेच्या प्रश्नांसाठी तुरुंगात जावे लागले तरी जा, पण तडजोड करू नका. चड्ढा यांनी पक्षाचे हे मूळ तत्त्व सोडून दिले आणि भीतीपोटी तडजोड करण्यास सुरुवात केली. आप हायकमांड आणि आपच्या धोरणांपासून लांब झालेले राघव चढ्ढा हे दुसरे खासदार होय. यापूर्वी, राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनीही पक्षापासून आपली वेगळी चूल मांडली आहे. चढ्ढा 2022 पासून खासदार आहेत. 2028 पर्यंत ते खासदार असतील. पक्षाने त्यांचे उपनेते पद काढून घेतले असले तरी त्यांची खासदारकी हिसकावून नाही घेऊ शकत. यानंतर काय करायचं हे चढ्ढा स्वतः ठरवतील. मात्र, आपला पक्ष सोडून ते दुसर्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. मालिवाल यांनी जसं एकला चलोची भूमिका स्वीकारली आहे तशीच भूमिका चढ्ढासुद्धा स्वीकारतील. मात्र, ‘घायल हूं इसिलिए घातक हूं’ असं जे ते म्हणाले त्याचा विचार व्हायला हवा. चढ्ढा आता जरी पक्षापासून लांब झाले असले तरी पक्षाच्या आतील बर्याच गोष्टी त्यांना महिती असतील. या बाबी जगजाहीर करून ते आप ला अडचणीत आणू शकतात. यामुळे ते पुढं काय करणार हे पाहणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.