पुणे जिल्हा | मतलबी ठेकेदारांच्या विरोधात संताप

इंदापूर, (प्रतिनिधी) – केंद्र सरकार व राज्य सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला घराला पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी हक्काचे मिळावे, यासाठी ‘हर घर जल’या योजनेअंतर्गत कोट्यवधी निधीच्या रकमा इंदापूर तालुक्यातील गावोगावी दिल्या; मात्र शासनाच्या चांगल्या उद्देशाला केराची टोपली दाखवत, पैसे उकळण्याचा धंदा जोरात झाला.
यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते साइडपट्ट्या बेचिराख करत शासकीय निधीचा मलिदा लाटला गेला. त्या रस्त्यांचा गुन्हा नसताना त्यांना जखम करून पाइपलाइन गेल्या. त्यामुळे गावागावातून अशा मतलबी ठेकेदारांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
असाच प्रकार इंदापूर तालुक्यातील वरचामळा वरकुटे खुर्द येथील रस्त्याचा आहे. पाणी योजनेच्या पाइपलाइन पुरण्यासाठी नवीन रस्ता झाल्यानंतर सहा महिन्यातच रस्ता उखरला, बरं हा रस्ता फक्त अडीचशे फूट लांबीचा आहे. शंभर फुटांवरून पाइपलाइन घेऊन जा, अशी विनवणीही येथील स्थानिक शेतकर्यांनी नागरिकांनी त्या ठेकेदाराला केली.
नवीन रस्ता फोडू नका सांगितल्यावर कंत्राटदार म्हणाला, दोनच दिवसांत आहे असा रस्ता करून देतो. किती दोन पिशव्या सिमेंट लागेल. आता दोन वर्षे झाली, अनेकदा कंत्राटदाराला येथील शेतकरी नागरिक फोन करत आहेत, संपर्क साधत आहेत. मात्र हा रस्ता दुरुस्ती करून मिळतच नाही.
त्यामुळे त्याच्या नातेवाईकांकडे देखील निरोप दिले. पण कंत्राटदार काही रस्ता दुरुस्त करून देत नाही. विशेष बाब म्हणजे या पाणी योजनेची पाइपलाइन पुरली आहे. त्या पाइपलाइनचे एकही कनेक्शन वस्तीवरील एकाही माणसाने घेतले नाही. अथवा यातून पाणी आले नाही.
ठेकेदाराने रस्ते दुरुस्त करावेत
वरकुटे खुर्द या एकाच गावात नाही तर तालुक्यातील प्रत्येक गावात ज्या ठेकेदाराने रस्ते बेचिराक केले आहेत. त्यांच्याकडून ते रस्ते दुरुस्त करून शासनाने घ्यावे. अशी मागणी नागरिक करत आहेत.





