पाकिस्तानला भरली आणखी धडकी ! भारत फ्रान्सकडून खरेदी करणार २६ ‘राफेल-एम’ ; ६३ हजार कोटींचा करार

Rafale Marine Aircraft । भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि फ्रान्स आज दिल्लीत राफेल खरेदीसाठी मोठा करार होणार आहे. २६ राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी ६३,००० कोटी रुपयांच्या करारावर दोन्ही देशाकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. या प्रसंगी, भारतीय संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि भारतातील फ्रेंच राजदूत दोन्ही देशांचे प्रतिनिधित्व करतील.
समोर आलेल्या माहितीनुसार, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग भारताकडून उपस्थित राहू शकतात, तर फ्रान्स आणि भारताचे संरक्षण मंत्री व्हर्च्युअल पद्धतीने समारंभात सहभागी होतील. स्वाक्षरी समारंभ संरक्षण मंत्रालयाच्या साउथ ब्लॉकच्या बाहेर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी फ्रेंच संरक्षण मंत्री स्वतः येणार होते, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला.
आयएनएस विक्रांतमध्ये समाविष्ट होणार Rafale Marine Aircraft ।
राफेल एम जेट्स आयएनएस विक्रांतवरून चालवले जातील आणि सध्याच्या मिग-२९के विमानांना पूरक असतील. भारतीय हवाई दलाकडे २०१६ मध्ये विकत घेतलेल्या ३६ राफेल विमानांचा ताफा आधीच आहे, जो अंबाला आणि हासीमारा येथे तैनात आहे. या नवीन करारानंतर, भारतातील राफेल विमानांची एकूण संख्या 62 होईल, ज्यामुळे देशाच्या 4.5 पिढीच्या लढाऊ विमानांची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल. भारतीय विमानवाहू जहाजांवर, विशेषतः आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यासाठी २६ राफेल सागरी लढाऊ विमानांची तातडीने आवश्यकता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जाणून घ्या भारताची योजना काय ?
कामगिरी आणि देखभालीतील समस्यांमुळे मिग-२९के लढाऊ विमानांचा ताफा काढून टाकण्याची तयारी सुरू आहे. ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने २६ राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी भारतातील सर्वात मोठ्या संरक्षण कराराला मान्यता दिली. या करारात २२ सिंगल-सीटर आणि ४ ट्विन-सीटर जेट्सचा समावेश आहे. यासोबतच, विमानांच्या देखभालीसाठी, लॉजिस्टिक्स सपोर्टसाठी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि स्वदेशी घटकांच्या निर्मितीसाठीही मोठे पॅकेज देण्यात आले आहे.
राफेल मरीनची वैशिष्ट्ये Rafale Marine Aircraft ।
* राफेल मरीन विमान एका मिनिटात १८ हजार मीटर उंचीवर पोहोचू शकते. राफेल मरीन हे पाकिस्तानकडे असलेल्या ए-१६ विमानांपेक्षा आणि चीनकडे असलेल्या जे-२० विमानांपेक्षा चांगले आहे. हे विमान त्याच्या उड्डाणाच्या ठिकाणापासून ३७०० किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकते.
* हे विमान विशेषतः विमानवाहू युद्धनौकेसाठी डिझाइन केले आहे. ते शत्रूच्या रडारला चकमा देण्यास देखील सक्षम आहे. राफेल मरीन विमान हिमालयासारख्या अत्यंत थंड भागातही उड्डाण करू शकते.
* राफेल मरीनचे वजन राफेलपेक्षा थोडे जास्त आहे. माहितीनुसार, त्याचे वजन अंदाजे १०,३०० किलो आहे. राफेलचे पंख वाकू शकत नाहीत, परंतु राफेल मरीनचे पंख पूर्णपणे वाकू शकतात.





