पाकिस्तानात अहमदींवरील अत्याचारात वाढ, थेट नमाजपासून रोखले

लाहोर – पाकिस्तानातील कट्टरवादी इस्लामी राजकीय पक्षांकडून अहमदी वंशियांवरील अत्याचारांमध्ये वाढ केली गेली आहे. पंजाब प्रांतातल्या काही शहरांमध्ये अहमदी समुदायाला शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी मशिदींमधील प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे.
फैसलाबाद, सारगोधा लय्याह, गुरजनवाला, सियालकोट, बहावलपूर आणि ओकरा या पंजाब प्रांतातल्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या शुक्रवारी तेहरिक ए लबाईक पाकिस्तानच्या सदस्यांनी अहमदींच्या मशिदींना वेढा घालून अहमदींना शुक्रवारची विशेष नमाज अदा न करण्यासाठी धमकावले. अहमदींना मुस्लिमांच्या रिवाजाप्रमाणे नमाज अदा करता येणार नाही, असे सांगितले गेले. जमियत -ए-अहमदिया पाकिस्तानने ही माहीती दिली. यावेळी अहमदींच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली गेली.
फैसलाबादेत अहमदींच्या मशिदीत घुसून प्रार्थना करणाऱ्यांना दमदाटीही केली गेली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता अहमदींच्या मशिदी सील करण्याची मागणी टीएलपीच्या सदस्यांनी केली. यापूर्वी कराची आणि डस्का शहरात शुक्रवारची नमाज अदा केल्याबद्दल पोलिसांनी ६० हून अधिक अहमदींवर गुन्हा दाखल केला होता आणि ४५ जणांना अटक केली होती.
कट्टरवादी पक्षांनी अहमदी दुकानदारांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी अहमदींचा छळ देखील केला जात असतो. अहमदींना प्रार्थना करण्यापासून रोखणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन असून यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप जेएपीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये १९७४ पासून अहमदींना बिगर मुस्लिम घोषित केले गेले आहे. पाकिस्तानच्या २२० दशलक्ष लोकसंख्येपैकी १० दशलक्ष लोकसंख्या बिगर मुस्लिम आहे.





