Radhakrishna Vikhe : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले आहे. रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांत पत्रकार परिषद घेऊन अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच संबंधित विमान कंपनी आणि काही नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला. “रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. चौकशीबाबत सरकारची भूमिका विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री चौकशीबाबत सक्षम निर्णय घेत असून आवश्यक त्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. कुटुंबीयांनी CBI चौकशीची मागणी केली असल्यास सरकार त्याबाबतही विचार करेल. “हा अपघात अत्यंत दुःखद आहे. कुटुंबीय आणि राज्यातील जनतेला सत्य समजणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणाचे राजकारण करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. “अजित पवार जिवंत असताना कसे वागलात?” विखे पाटील यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांनाही थेट सवाल केला. “अजित पवार जिवंत असताना तुम्ही त्यांच्यासोबत कसे वागलात? त्यांना योग्य सन्मान दिला का? मुख्यमंत्रीपदाची संधी असताना ती का नाकारली गेली?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. “अपघाताचे भांडवल करण्याऐवजी आधी या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला द्या,” असे म्हणत विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून अपघाताच्या चौकशीसोबतच आरोप-प्रत्यारोपांची मालिकाही अधिक तीव्र होताना दिसत आहे.