“कुणाला बरोबर घ्यायचं…” भविष्यात राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत विखे पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार का याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर देखील याबाबतच्या चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे भाजपसह राष्ट्र्वादीतील अनेक नेते सावध प्रतिक्रिया देताना दिसतात. नुकतंच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या प्रचार सभांबाबत भाष्य केले. मविआच्या वज्रमूठीला तडे गेले आहेत असं विखे पाटील यावेळी म्हणाले.
माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी अजित पवार शरद पवार आणि राष्ट्र्वादीबाबत देखील प्रतिक्रिया दिली. “अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात” असं विखे पाटील यावेळी म्हणाले. तसेच शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही त्यांची हातोटीच आहे. त्यांना अजित पवार संभ्रमात ठेवतात यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असू शकते” असं देखील विखे यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी भाजपसोबत एकत्र आली तर भाजप लढण्यासाठी इच्छुक आहे का ? असा सवाल देखील यावेळी विखे पाटील यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले,”“भविष्यात राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचं की नाही हा निर्णय पक्षपातळीवर पक्षाचे नेतेमंडळी घेतात. कुणाला बरोबर घ्यायचं कुणाला नाही हा निर्णय पक्षाने घ्यायचा असतो” असं स्पष्ट मत यावेळी त्यांनी मांडलं.





