Radhakrishna Vikhe Patil : “व्यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे उत्तर नाही” – लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता मंत्री विखेंचा टोला

प्रभात वृत्तसेवा
राहाता – त्यांना काय टीका करायची ते करू द्या, असे वक्तव्य करणारे नेतृत्व आपल्याला पाहिजे का? याचा समाज बांधवांनी विचार केला पाहिजे. तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर, माझ्याकडे याचे उत्तर नाही, अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.कोणतेही आंदोलन करताना मागण्यांची भूमिका मांडणे गरजेची असते, असे सांगून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही आमची भूमिका आधीपासून स्पष्ट होती.
मात्र, काही नेत्यांकडून केवळ बागुलबूवा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गॅझेटमधील नोंदी १९६७ सालापासून आहे. दाखला मिळण्यासाठी शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. मात्र काही व्यक्तिंनी प्रसिध्दीसाठी वक्तव्य करताना भान ठेवले नाही. सामाजिक सलोखा बिघडविण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
आरक्षणाच्या बाबतीत याचिका न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाबाहेर काही लोकं मुक्ताफळ उधळीत असतील तर त्याला आपण काय उत्तर देणार, अशा टीका झाल्यावर वेदना होतातच, आमचे देखील अनेकांशी तात्वीक मतभेद आहेत, मात्र अशा भाषा आम्ही कधी वापरल्या नाहीत.
तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर, माझ्याकडे याचे उत्तर नाही, त्यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता समाचार घेतला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या नामकरणावरून कोणी काही वक्तव्य करीत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. येथे येऊन कोणी जातीय सलोखा बिघडविणार असेल तर आम्ही निश्चित कारवाई करू. जिल्ह्याचे नाव का बदलले हे विचारण्याचा आधिकार आता त्यांना नाही,अशी स्पष्ट भूमिका ना.विखे पाटील यांनी मांडली.





