रिपब्लिकन अधिवेशनादरम्यान वांशिक शेरेबाजी; शीख संसद महिलेच्या प्रार्थना गायनावर केली टीका

वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाच्या ४ दिवसांच्या अधिवेशनादरम्यान संसद सदस्या हरमित धिल्लन यांनी अरदास ही धार्मिक प्रार्थना गायल्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. ट्रम्प यांच्या उपस्थितीत ही धार्मिक प्रार्थना गाण्यावर होत असलेल्या टीकेचा भारतीय वंशाचे संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी निषेध केला आहे. धिल्लन यांना वर्णद्वेषी प्रतिसाद दिला जाणे अमान्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
धिल्लन यांनी अधिवेशनामध्ये अरदास गायन केल्यानंतर त्यांना ट्रोल केले जाऊ लागले. त्यांच्यावर टीका करणाऱ्यामध्ये बहुतेक त्यांच्या स्वतःच्याच पक्षातले नेते आहेत. या टीकाकारांचा कृष्णमूर्ती यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अमेरिकेत वंश किंवा धर्माच्या आधारावर भेदभावाला स्थान नाही. जेव्हा असा भेदभाव घडतो, तेव्हा डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांनी त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे, असे कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे.
मी शीख स्थलांतरितांच्या कुटुंबातून आले आहे. आज रात्री तुमच्यासोबत, माझे सहकारी रिपब्लिकन आणि पाहुण्यांसोबत ही प्रार्थना शेअर करताना मला सन्मान वाटतो, ही प्रार्थना जगभरातील २५ दशलक्षांहून अधिक लोकांनी प्रचलित केलेली माझी श्रद्धा आणि परंपरा आहे, असे धिल्लन यांनी म्हटले होते.





