Rabi Season: रब्बी पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ज्वारी, बाजरी व मका या भरडधान्यांच्या नोंदणीला पारोळा येथे मोठी गर्दी होत आहे. मात्र, नोंदणी केंद्रावर योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून, प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने १ एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून, ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. पारोळा केंद्रावर परिसरातील शेतकरी कागदपत्रांसह मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, एकाच वेळी मोठी गर्दी आणि तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी प्रक्रियेत गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्यात शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र दिसत आहे. नोंदणी व खरेदीचे वेळापत्रक : नोंदणी कालावधी: १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ (ऑनलाईन) खरेदी कालावधी: १ मे ते ३० जून २०२६ नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ‘शेड्युलिंग’नुसार संदेश पाठवून धान्य विक्रीसाठी बोलावले जाणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल आदी ठिकाणी एकूण १८ उपअभिकर्ता संस्थांना नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. रब्बी हंगामातील पिकांना आधारभूत किंमत मिळावी, या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. मात्र, केंद्रांची संख्या अपुरी आणि नोंदणीची मुदत मर्यादित असल्याने गोंधळ वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त नोंदणी खिडक्या सुरू कराव्यात किंवा गावागावांत शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने ३० एप्रिलपूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले असले, तरी प्रत्यक्षात नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.