पुणे | पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पदवीस्तरीय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्याला10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
या स्पर्धेत इतिहास, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी अशा अनेक विषयांमधून सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातील. सहभागी होण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
देशभरात १९ ते २१ सप्टेंबर या काळात ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्याला 8 लाखांचे रोख पारितोषिक आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्याला 6 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.
आरबीआय ९० क्विझ असे स्पर्धेचे नाव आहे. या नावाच्या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करु शकतील.
देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर 2024 रोजी 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजे उमेदवाराचा जन्म 1 सप्टेंबर 1999 रोजी किंवा त्यानंतर झाला असावा.
एका महाविद्यालयातून अनेक संघ सहभागी होऊ शकतात. या प्रश्नमंजुषामध्ये एकूण चार टप्पे असतील.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 25 सेकंदांचा अवधी मिळेल आणि सर्व प्रश्न वस्तूनिष्ठ स्वरूपात असतील, म्हणजेच चार पर्यायांमधून एक योग्य उत्तर निवडावे लागेल.प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 मार्क मिळेल. चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही गुण कापले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.





