पिंपरी | एकीकडे रांगा, दुसरीकडे विद्यार्थी मिळेना

पिंपरी, (प्रतिनिधी) – एकीकडे महापालिकेच्या काही शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या रांगा लागत असल्या तरी दुसरीकडे मात्र काही शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक उत्सुक नाहीत. गुणवत्ता ढासळल्याने ११ शाळांचा पट घसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थी संख्या शंभरच्या आत आल्याने शाळेतील मुख्याध्यापक पदावर गदा आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी पसंती द्यावी, यासाठी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, दप्तर, बूट आदी शालेय साहित्य दिले जाते. सध्या तर, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या ई लर्निंग प्रकल्पांतर्गत डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्यास सुरुवात केली आहे.
तरी देखील पालिकेच्या १०५ प्राथमिक शाळांपैकी ११ शाळांचा पट घसरला आहे. त्यातील काही शाळांचा पट दिडशेच्या आत आला आहे. तर, काही शाळांची विद्यार्थी संख्या शंभरच्या आत आली आहे. त्यामुळे या शाळा मुख्याध्यापक पदास पात्र नाहीत. प्रशासकीय उदासिनतेमुळे या शाळा शेवटची घटका मोजत असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे पिंपळे गुरव येथील पालिकेच्या एका शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. पालिकेच्या काही शाळांचा दहावीचा निकाल वाखणण्याजोगा आहे. तर, दुसरीकडे ११ शाळांचा पट टिकवून ठेवण्यात शिक्षकांना अपयश आले आहे. काही शाळांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे, तर काही ठिकाणी कमी विद्यार्थी आहे.
शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांचीही संख्या कमी आहे. ज्या ठिकाणी शाळेची पटसंख्या कमी आहे. त्याठिकाणी तुकड्या कमी करून तेथील शिक्षक इतर शाळांमध्ये वर्ग केले जात आहेत. मात्र, या शाळा वाड्या वस्तीवर असल्याने याठिकाणी लोकसंख्या कमी आहे. याठिकाणी फक्त पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवले जातात. पाचवी ते आठवीसाठी पाल्याला दुसर्या शाळेत प्रवेश घ्यावा लागत असल्याने पालकांची तारांबळ होत आहे.
पठारेमळा, बुर्डेवस्ती, वडमुखवाडी, काळजेवाडी, धायरकरवाडी या वाड्यावस्तीवरच्या शाळांची अशी बिकट परिस्थिती झाली आहे. तसेच, निगडी, काळभोरनगर, पिंपरी नगर, केशवनगर या शहरी भागातील शाळांमध्ये १५०च्या आत पट आला आहे. तसेच पटसंख्येचा जो आकडा आहे, त्यामध्येही अर्धे विद्यार्थी गैरहजर असल्याचे सांगितले जाते.
विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शाळा स्तरावर काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे एका वर्गात २० किंवा २५ पटसंख्या असते. नवीन शैक्षणिक वर्षात या शाळेत प्रवेश घेण्यास पालकांकडून पसंती का मिळत नाही, याबाबत शाळेतील शिक्षक आणि शिक्षण विभागाला कसलेही सोयरसुतक नाही.
जबाबदार कोण ?
पालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये डिजिटल शिक्षण शिकवले जाते. विद्यार्थ्यांना कोडिंगचे प्रशिक्षणही दिले जाते. पालिकेच्या पाच शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. खासगी शिक्षण महाग झाल्याने पालिकेच्या शाळेत इंग्रजी शिक्षण घेता यावे, यासाठी पालिकेने पाच शाळा सुरु केल्या असल्या तरी त्या खासगी संस्थांना चालवण्यास दिल्या आहेत.
एकीकडे पालकांकडून या शाळांना प्रतिसाद मिळत असला तरी मराठी व सेमी इंग्रजी शाळांमध्ये बिगारी, मजूर, वीटभट्टी कामगार, फेरीवाले आदी घटकातील मुले शिक्षण घेत आहेत. खासगी संस्थांकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा पट वाढवला जातो. तर, प्रशासनाकडून वाड्या वस्त्यांवरील मराठी, सेमी इंग्रजी शाळेचा पट वाढवण्यास प्रयत्न होताना दिसत नाहीत.
अकरा शाळांपैकी काही शाळा वाड्यावस्ती येथे असल्याने पटसंख्या कमी आहे. या शाळा मुख्याध्यापक पदास पात्र नाहीत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून पटसंख्या टिकवून ठेवण्याबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करुन तोडगा काढला जाईल. – संगीता बांगर प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
दिडशेच्या आत पट असणार्या शाळा
शाळा पट
विद्यानिकेतन – १२५
केशवनगर – १२५
काळभोरनगर – ११७
वडमुखवाडी – १०७
चिंचवडगाव (उर्दू) – १३०
पिंपरीनगर (उर्दू) – ८४
पिंपरीनगर – ८२
काळजेवाडी – ७५
बुर्डेवस्ती – ६८
पठारेमळा – ५९
धायरकरवाडी – ३०





